काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी
काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय.
जम्मू / काश्मीर : काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय.
मीडियानं, आपला फोटो दहशतवादी बुरहान वानीसोबत लावल्यानं तो प्रचंड नाराज झालाय. एका बाजुला बुरहान वानी आणि दुसऱ्या बाजुला शाह फैजल असा फोटो लावून या दोघांची तुलना करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतेय.
'एका दहशतवाद्यासोबत माझा फोटो लावून मीडियात माझी तुलना केली जातेय. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या शोकमय वातावरणात हा असा प्रचार करणं म्हणजे लोकांना विभाजित करून त्यांच्यात आणखी क्रोध निर्माण करण्यासारखाच प्रकार आहे. अशा पद्धतीच्या थुरकट चर्चेचा विषय बनल्यानं मी हैराण आहे. ही वायफळ बडबड सुरू राहिली तर मी राजीनामा द्यायला फार उशीर करणार नाही' असं फैजलनं म्हटलंय.
जेव्हा राज्यचं आपल्या नागरिकांना ठार करतं... अपंग बनवतं... तेव्हा याशिवाय क्रूर जखम आणखी कोणतीही असू शकत नाही... आणि सरकारही लोकांच्या जखमांपासून दूर राहू शकत नाही. आपला प्रयत्न परिस्थिती सांभाळण्याचा असेल... असंही फैजलनं म्हटलंय.
यासाठी वेळ लागेल... पण, तोपर्यंत आपल्याला त्यांच्यापासून दूर राहायला हवं... जे केवळ टीआरपीसाठी काश्मीरमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू ज्यांनी काश्मीरमध्ये आपले प्राण गमावलेत आणि आपल्या डोळ्यांची ज्योत हरवली..., असंही फैसलनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.