अनंतनागमधल्या कारवाईचा पर्यटकांना फटका, अमरनाथ यात्रा रोखली
शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईचा फटका नाशिककरांना बसलाय.
अनंतनाग : शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईचा फटका नाशिककरांना बसलाय.
काल, जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वंघोषित कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घालण्यात आलं होतं.
यानंतर स्थानिक लोकांकडून दगडफेक करण्यात आलीय. पर्यटक गाड्यांवरही ही दगडफेक झाली. त्यात महाराष्ट्रातल्या जवळपास १५० लोकांना घेऊन गेलेल्या एका बसवरही दगडफेक करण्यात आली. मात्र प्रशासनानं वेळीच खबरदारी घेत या पर्यटकांना सर्वोतोपरी सहकार्य केलंय.
अमरनाथ यात्रा थांबवली
हिजबुल मुजाहिद्दीचा दहशतवादी बुरहान वानी याच्या एन्काऊंटरनंतर काश्मिर खोऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा थांबवण्यात आलीय... अमरनाथ यात्रेकरुंच्या तुकडीला जम्मूमध्येच थांबवण्यात आलंय.
काश्मीर बंदची हाक
फुटीरतावाद्यांनी काश्मीर बंदची हाक दिलीय. या बंद दरम्यान फुटीरतावाद्यांकडून अमरनाथ यात्रेकरुंना लक्ष्य केली जाण्याची भीती वर्तवली जातेय. सैय्यद अली शाह गिलानी, यासिन मलिक, मीरवाईज उमर फारुकसह अन्य फुटीरतावादी नेत्यांना शुक्रवारपासून नजरकैदेत ठेवण्यात आलंय.