पणजी : गोव्यात इंग्रजी शाळांच्या अनुदानावरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.


भाजपच्या गोटात चिंता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघानं पदमुक्त केलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाल्यानं भाजपच्या गोटात चिंता पसरलीय. या मेळाव्याला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाल्यानं वेलिंकरांच्या अपेक्षा वाढल्यात. या मेळाव्यात भाजपला हरवण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेण्याचं आवाहन वेलिंगकर यांनी केलंय.


काय आहे मतांचं गणित?


वेलिंगकर यांच्या या पवित्र्यामुळे भाजपच्या गोटात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि त्याला कारणही तसंच आहे. गोव्यात संघाच्या ४० शाखा आणि ४० शिशु वर्ग साप्ताहिक मिलन आहेत. याद्वारे सुमारे २ लाख कार्यकर्ते संघाशी जोडले आहेत. एकूण मतदारापैंकी हे प्रमाण २० % आहे (एकूण मतदार १० लाख)


भाजपचे १० आमदार २००० पेक्षा कमी मताने जिंकून येतात. यामुळे भाजपच्या मत पेटीवर  खूप मोठा परिणाम होऊ शकतो. याचाच फायदा वेलिंगकर उठवू पाहत आहेत.


शिवसेना डाव साधणार?


दरम्यान, गोव्यात संघ आणि भाजपत झालेल्या तणावाचा फायदा शिवसेना घेऊ पाहतीय. काल संध्याकाळी फिडाल्गो हॉलेटमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत आणि संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. तसेच, काही वेळा पूर्वी पणजीमध्ये राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या स्थानिक प्रमुख नेत्यांची बैठक पार पडलीय. त्यात वेलिंगकर यांचे बंड आणि शिवसेनेला गोव्याच्या राजकारणात शिरकाव करण्याची संधी या विषयावर प्रामुख्याने चर्चा झालीय. शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवलीय. संघातून पदमुक्त केल्यानंतर वेलिंगकर यांनी गोवा प्रांताचा स्वतंत्र आरएसएस स्थापन केलाय.