चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला आहे. चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अपोलो रुग्णालयातल्या सीसीयूमध्ये त्यांच्यावर अडीच महिन्यांपासून उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर लंडनमधील डॉक्टरांचाही सल्ला घेतला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्सही दिल्लीवरून रवाना झालेत. सध्या त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, तमिळनाडूचे प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव अपोलो हॉस्पिटलला मध्यरात्री दाखल झाले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी जयललिता यांच्या प्रकृतीबाबात चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राव यांच्याशी दूरध्वनीवरून जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी केलीय. तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनीही जयललिता यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.


रुग्णालयात राज्यमंत्रीमंडळातील मंत्री दाखल झाले असून, पन्नीरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकही घेण्यात आली आहे. जयललिता यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केलीय. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रुग्णालया बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील सगळ्या सुरक्षा दलांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसचं मद्रास आणि अण्णा विद्यापीठअंतर्गत येणा-या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आज होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील  सर्व  चित्रपटातील शो रद्द करण्यात आले आहे.