चेन्नई : तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांचं निधन झालं आहे. 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललिता यांचं पार्थिव पोएस गार्डन येथे हलवलं त्यानंतर राजाजी हॉलमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. चेन्नईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जनतेचा शोक अनावर झाला आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अम्मा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.


तमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक पाळण्यात येणार आहे. तर शाळा, कॉलेज तीन दिवस बंद राहणार आहेत. पाच वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या अम्मा कायम तळागाळातील जनतेसाठी कार्यरत होत्या. सिनेसृष्टीत ठसा उमटवल्यावर अम्मांनी राजकीय पटलावरही सामान्यांसाठी चांगले निर्णय घेऊन जनतेच्या हृदयावर राज्य केलं.