मीच जयललितांचा खरा मुलगा, तरुणाचा दावा
एआयएडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांच्या मृत्यूनंतर आता `मीच जयललितांचा खराखुरा मुलगा` असल्याचा दावा एका तरुणानं केलाय.
चेन्नई : एआयएडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांच्या मृत्यूनंतर आता 'मीच जयललितांचा खराखुरा मुलगा' असल्याचा दावा एका तरुणानं केलाय.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी होतेय. इंडिया टुडेनं दिलेल्या माहितीनुसार, इरोडचा रहिवासी असलेला कृष्णमूर्ती यांनी तमिळनाडूच्या चीफ सेक्रेटरी गिरीजा वैद्यनाथन यांच्याकडे तक्रार दाखल केलीय.
आपण जयललितांचा एकुलता एक मुलगा असल्याचा तसंच जयललिता यांची हत्या झाल्याचा दावा या तरुणानं केलाय. जयललिता यांचा मित्र वनिथमनी यांच्या घरी आपल्या दत्तक आई-वडिलांसोबत कृष्णमूर्ती राहत आहे.
'शशिकलांनीच दिला जयललितांना धक्का...'
आपण, 14 सप्टेंबर 2016 रोजी जयललिता यांची पोएस गार्डनमध्ये 4 तासांची भेट घेतली होती. 22 सप्टेंबर रोजी आई जयललिता जगासमोर आपणच तिचा मुलगा असल्याचं जाहीर करणार होती... याच कारणामुळे जयललिता आणि शशिकला यांच्यात वाद झाला आणि शशिकला यांनी जयललिता यांना धक्का दिला... सीडीवरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावाही कृष्णमूर्तीनं केलाय.
आपण घाबरलो असल्यानं समोर येण्याची हिंमत झाली नव्हती... असंही त्यानं म्हटलंय. परंतु, आपणच जयललितांचा मुलगा असल्यानं त्यांच्या संपत्तीचा वारसदार असल्याचा दावाही कृष्णमूर्तीनं केलाय.
बरेच दिवस हॉस्पीटलमध्ये भर्ती राहिल्यानंतर 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचा मृत्यू झाला होता. तामिळनाडूचे माजी विधानसभा अध्यक्ष पीएच पांडियन यांनीही, जयललितांना पोएस गार्डनमध्ये मुख्यमंत्री जयललिता यांना कुणी धक्का दिला होता? असा सवाल केला होता.