नवी दिल्ली : रेल्वेची भाडेवाढ झाली नाही तरी रेल्वेच्या उत्पनात वाढ करण्यासाठी सामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे छुपे काम सुरु आहे. आता रेल्वेतील लोअर बर्थसाठी 50 ते 75 रुपये तिकिटाशिवाय जादा मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्याच्या तिकिटासाठी जास्त पैसे तर लांबचा प्रवास करण्यासाठी अंतरानुसार पैसे मोजावे लागणार आहे. आता लोअर बर्थसाठी तिकिटाशिवाय अधिकचे 50 रुपये मोजावे लागणार असल्याने याचा फटका सर्वाधिक हा स्त्रिया, गरोदर माता आणि ज्येष्ठ नागरिकांना बसणार आहे. लोअर बर्थसाठी प्राधान्य त्यांनाच देण्यात येते. त्यामुळे हा निर्णय कितपत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.


दरम्यान, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे तिकिट बुक करताना लोअर बर्थ हवा असल्यास त्यासाठी आता 50 रुपये जास्त मोजण्याची तयारी ठेवा. कारण रेल्वे प्रशासन लवकरच लोअर बर्थसाठी अतिरिक्त वाढीव शुल्क घेण्याकरीता नवे धोरण आणण्याच्या तयारीत आहे. सीटच्या वाढत्या मागणीनुसार त्यावर वाढीव शुल्क आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.


लांब पल्ल्याचा प्रवास करणारे अनेक प्रवासी आता ऑनलाईन तिकीट बुकिंगला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आपल्याला हवी तशी सीट मिळावी, हा उद्देश त्यामागे असतो. रेल्वेचे तिकीट काढताना प्रवाशाला अप्पर बर्थ, मीडल बर्थ आणि साईड अप्पर बर्थ असे पर्यायही उपलब्ध असतात. परंतु बहुतांश प्रवाशांचा कल लोअर बर्थ निवडण्याकडे असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोअर बर्थची मागणी करणाऱ्या प्रवाशांकडून 50 रुपये अतिरिक्त शुल्क घेण्याचे ठरवले आहे. 


रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवत आहे. हा देखील त्याचाच एक भाग आहे. मात्र, स्त्रिया, गरोदर माता आणि ज्येष्ठांसाठीचा आधार हिरावून घेण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.