हैदराबाद : बॅंकांची फसवणूक करुन परदेशात पळालेल्या किंगफिशर किंग विजय माल्याला ५ मेला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. त्याने दिलेले ५० लाख रुपयांचे दोन चेक बाऊन्स झाल्याने माल्या दोषी ठरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५० लाख रुपयांचे दिलेले दोन चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी हैदराबाद कोर्टात खटला सुरु होता. या खटल्यात कोर्टाने विजय माल्याला दोषी ठरवलं आहे, यासंदर्भात ५ मे ला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. माल्याविरोधात जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने तक्रार केली होती.


चेक्स बाऊन्स प्रकरणी न्यायालयाने विजय माल्याविरोधात १३ मार्च रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि त्याला १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे बजावले होते. मात्र, माल्या देशाबाहेर पळून गेलाय. आता ५ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. यावेळी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.


दरम्यान या प्रकरणात विजय माल्याबरोबरच किंगफिशरचे माजी आर्थिक व्यवहार पाहणारे अधिकारी रघुनाथ के यालादेखील दोषी ठरवलं आहे.
 
हैदराबादमध्ये एयरपोर्ट अधिकाऱ्यांनी किंगफिशर विमान कंपनीविरोधात आधीच ११ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी हा एक गुन्हा आहे. याआधी हैदराबाद कोर्टने माल्या आणि रघुनाथला १० मार्चपर्यंत न्यायालयात हजर होण्यास सांगितले होते, तो हजर न झाल्याने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले.