नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्तारात मोदी सरकारच्या अतिशय तीक्ष्ण मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृती इराणींचं खातं बदललं जाईल, अशी कुणीच अपेक्षा केली नव्हती...पण मोदींनी नेमकं तेच केलं...सरकारच्या प्रतिमेविषयी अत्यंत जागरुक असणाऱ्या पंतप्रधानांना इराणींच्या निर्णयांमुळे होणाऱ्या अडचणी खुपल्या असणार हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी दुपारी दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये कॅबिनेटची बैठक झाली. प्रकाश जावडेकर आणि स्मृती इराणी एकत्र बाहेर पडले. मुखावर दोघांच्याही स्मित हास्य होतं. पण दिवस संपताना या दोघांची खाती बदलली होती. स्मृती इराणींचं मनुष्यबळ विकास खातं, जावडेकरांच्या खांद्यावर देण्यात आलं. खरंतरं मोदींनी स्मृती इराणींना मनुष्यबळ विकास मंत्र्यालय दिलं तेव्हा ते खूप मोठं बक्षीस मानलं जात होतं. राहुल गांधींना अमेठीत जाऊन टक्कर दिल्यावर आपल्या लहान बहिणीला मोदींनी दिलेलं ते गिफ्ट होतं.


संसदेत तावातावानं विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या स्मृती इराणींनी सरकारीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाही. पण या सगळ्याचं मूळ कारणही इराणींचे निर्णयच होते. हेही विसरून चालणार नाही. मोदींनी नेमंक
हेच लक्षात घेतलं आणि जावडेकरांवर आता मनुष्यबळ विकास खात्याची जबाबदारी टाकली.


जावडेकरांच्या तोंडी स्मृती इराणीबद्दल चांगले उद्गार असणं स्वाभाविक आहे. पण गेल्या दोन वर्षात इराणी आणि त्यांच्या कामाबद्दल कुणाचंही फारसं चागंलं मत नाही.


जेएनयूतल्या वादाच्या वेळी पोलीस कारवाईचं समर्थन असो की रोहित वेमूलाच्या आत्महत्येच्यावेळी तो जबाबदारी झटकण्याचं धोरण असो. इराणी सातत्यानं या ना त्या कारणानं वादात अडकत राहिल्या.
अभ्यासक्रमात जर्मन आणि संस्कृतचा समावेश, ट्विटरवर उफाऴून आलेला डिअर या शब्दाचा वाद असे अनेक वाद वारंवार त्यांनी केलेल्या चांगल्या कामावर पडदा टाकण्याचं काम करत होते.


सरकार चालवताना कार्यक्षमता आणि प्रतिमा या दोन्हीची योग्य सांगड घालणं अपेक्षित आहे. स्मृती इराणींच्या बाबतीत ही भट्टी फारशी जमली नाही. म्हणूनच इराणींकडे असणारं महत्वाचं खातं काढून त्यांना काहीसं कमी महत्वाचं वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलंय. नाही म्हणायला वस्त्रोद्योग हा देशातला दुसरा सर्वात मोठा रोजगार देणारा व्यवसाय आहे.


एका अर्थानं स्मृती इराणींची अवनती झाल्याचं बोललं जात असलं तरी राजकीय विश्लेषकांना मात्र काहीतरी वेगळीच शंका येतेय. उत्तर प्रदेशाच्या निवडणुका तोंडावर आहेत. काँग्रेसनं प्रियांका गांधींना मैदानात उतरवण्याची तयारी केलीय आणि त्यांना उत्तर देण्यासाठी स्मृती इराणींना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या रणात झाशीची राणी बनवण्याचा मोदी आणि शाहांचा प्लॅन तर नाही ना अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.