मुंबई : 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' सर्व्हिस देशाला धोकादायक असल्याचं सांगत व्हॉटसअपवर बंदी आणण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. पण, हे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉटसअपच्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन सर्व्हिसमुळे या अॅप्लिकेशनद्वारे पाठवण्यात आलेले सगळे मॅसेज एन्क्रिप्टेड होतात. म्हणजेच तुम्ही या अॅपवरून एखादा मॅसेज पाठवला तर तो केवळ एक व्यक्ती किंवा ग्रुप चॅटचा मेम्बर असलेला व्यक्तीच वाचू शकतो.


व्हॉटसअपच्या म्हणण्यानुसार, कोणतीही बाहेरील व्यक्ती या मॅसेजला डीकोड करून वाचू शकणार नाही. तसंच सायबर गुन्हेगारांपासूनही हे मॅसेज सुरक्षित राहतील. इतकंच नाही तर प्रशासनालाही हे मॅसेज वाचणं शक्य होणार नाही... सध्या तुमच्या मोबाईलमधलं व्हॉटसअप अपडेटेड व्हर्जन असेल तर समजा तुमचे मॅसेज सुरक्षित आहेत. 


काय म्हटलंय कोर्टानं... 


या याचिकेद्वारे इन्स्टंट मॅसेजिंग अॅप 'व्हॉटसअप'वर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती. पण, ही मागणी फेटाळून लावताना कोर्टानं याचिकाकर्त्यांना या प्रकरणात सरकार किंवा दूरसंचार न्यायाधिकरणाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलाय. 


हरियाणाचे आरटीआय कार्यकर्ते असलेल्या सुधीर यादव यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. व्हॉटसअपनं एप्रिलपासून प्रत्येक संदेशसाठी आपली २५६ बिट एन्क्रिप्शन सर्व्हस सुरू केली होती... यामुळे हे संदेश क्रॅक करणं शक्य नाही. 'व्हॉटसअप'ची एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन सर्व्हिसचा दहशतवादी चुकीच्या कारणांसाठी वापर करू शकतात. त्यामुळे ही सर्व्हिस देशासाठी धोकादायक आहे, असं या याचिकेत म्हटलं गेलं होतं.