ओबामांना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्या पूजाला हवाय `समान हक्क`!
न्याय आणि समान हक्कासाठी भारतीय वायु सेनेची विंग कमांडर पूजा ठाकूर हिनं ट्रिब्युनलकडे दाद मागितलीय. वायुसेनेत पूजाला स्थायी कमिशन नाकारलं गेलंय.
नवी दिल्ली : न्याय आणि समान हक्कासाठी भारतीय वायु सेनेची विंग कमांडर पूजा ठाकूर हिनं ट्रिब्युनलकडे दाद मागितलीय. वायुसेनेत पूजाला स्थायी कमिशन नाकारलं गेलंय.
गेल्या वर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडला मुख्य अतिथी असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना गार्ड ऑफ ऑनर देणारी पूजा तेव्हा चर्चेत आली होती. राष्ट्रपती भवनात एखाद्या राजकीय पाहुण्याला देण्यात येणाऱ्या 'गार्ड ऑफ ऑनर'चं नेतृत्व करणारी पहिला महिला म्हणून पूजानं इतिहास रचला होता. आज मात्र वायुसेनेत समान हक्क मिळावा यासाठी पूजा झगडतेय.
काही महिन्यांत पूजा होतेय निवृत्त
पूजा ठाकूर येत्या काही महिन्यांमध्ये निवृत्त होणार आहे. परंतु, आपल्याला स्थायी कमिशन मिळावं... आणि पुढेही वायुसेनेसोबत देशाची सेवा करता यावी... जशी तिचे इतर पुरुष सहकाऱ्यांना संधी मिळते, तशीच संधी आपल्यालाही मिळावी, अशी पूजाची मागणी आहे.
पूजाचे पिता सेनेतून रिटायर झालेत. तसंच तिला एक नऊ वर्षांची मुलगीदेखील आहे. पूजा सध्या एअरफोर्सच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह विंगमध्ये तैनात आहे.