`वुमन ऑफ मार्स`... इस्रोतल्या नारीशक्तीला सलाम!
`कुछ उडाने नाकाम क्या रही, वो बडे मजेसे नाकामिया गिनने लगे... आज आलम ये है की वो हमें आसमाँ मे ढुंढते है` कुणीतरी लिहिलेला हा शेर... आत्ता त्याची आठवण होतेय त्याला कारणही तसंच आहे....
मुंबई : 'कुछ उडाने नाकाम क्या रही, वो बडे मजेसे नाकामिया गिनने लगे... आज आलम ये है की वो हमें आसमाँ मे ढुंढते है' कुणीतरी लिहिलेला हा शेर... आत्ता त्याची आठवण होतेय त्याला कारणही तसंच आहे....
15 फेब्रुवारी 9 वाजून 29 मिनिटांनी 104 उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही सी 37 झेपावलं... आणि इस्रोनं अवकाशात नवा इतिहास रचला... हे खरंच घडू शकतं आणि भारतासारख्या विकसनशील देशानं हे करुन दाखवलं, म्हणून इतर देश भारताकडे कुतूहलानं आणि आश्चर्यानं पाहायला लागले... हे यश होतं टीम इस्त्रोचं... यानिमित्तानंच आम्हीही शोध घ्यायचा ठरवला इस्त्रोमधल्या नारीशक्तीचा...
इस्त्रोच्या मार्स मिशन अर्थात मंगळयान मोहिमेत महिला शास्त्रज्ञांचा सहभाग होता. मंगळयानाच्या यशाचं सेलिब्रेशन करणारा फोटो त्यावेळी व्हायरल झाला होता. फोटोत दिसणाऱ्या या सगळ्या महिला इस्रोच्या प्रशासकीय कर्मचारी असल्याचं इस्त्रोनं स्पष्ट केलं होतं. पण मंगळयानात विशेष उल्लेख करावा लागेल, तो रितू कारीधाल, अनुराधा टीके आणि नंदिनी हरिनाथ यांचा... या तिघी खऱ्या अर्थानं वुमन ऑफ मार्स आहेत.
रितू कारिधाल, डेप्युटी ऑपरेशन डिरेक्टर, इस्रो
आकाशातले ग्रह तारे नक्की कुठून येतात? चंद्राचा आकार कमी आणि जास्त कसा होतो? असे प्रश्न रितू कारिधाल यांना लहानपणी पडायचे... आणि लहानपणी वाटणारं हे कुतूहलच रितू यांना इस्त्रोपर्यंत घेऊन आलं. रितू कारिधाल मंगळयान मोहीमेच्या डेप्युटी ऑपरेशन डिरेक्टर होत्या... विद्यार्थिनी असताना विज्ञान आणि गणिताशी रितू यांची जास्त गट्टी होती. विज्ञान, इस्रो आणि नासाबद्दलचा कॉलम वाचण्यासाठीच त्या वर्तमानपत्र हातात घ्यायच्या... एमएससी केल्यानंतर त्या इस्त्रोत रुजू झाल्या... आता त्यांना इस्रोत अठरा वर्षं झाली. दोन मुलांची आई असलेल्या रितूंनी घर, करीअर आणि आई अशा तीनही आघाड्या सांभाळल्या... आज देशातल्या प्रथितयश शास्त्रज्ञ म्हणून रितू कारिधाल यांचं नाव घेतलं जातं.
नंदिनी हरीनाथ, डेप्युटी ऑपरेशन डिरेक्टर, इस्रो
नंदिनी हरिनाथ हे इस्रोमधलं आणखी एक महत्त्वाचं नाव... आई गणिताची शिक्षिका आणि वडील इंजिनिअर, अख्खं घर विज्ञानावर प्रेम करणारं... अशा घरात नंदिनी वाढल्या.... मंगळयान मोहिमेत नंदिनी डेप्युटी ऑपरेशन डिरेक्टर होत्या. मंगळयान मोहिमेच्या दरम्यानच त्यांच्या मुलीची बोर्डाची परीक्षा होती... नंदिनी यांच्यासाठी तो अत्यंत परीक्षेचा काळ होता... पण मायलेकी या परीक्षेत शंभरपैंकी शंभर गुण मिळवत उत्तीर्ण झाल्या. मंगळयान मोहिमेच्या यशानंतर स्पेस सायंटिस्ट म्हणून नंदिनी यांना जगभरात ओळख मिळाली.... आणि त्यांची मुलगी गणितात शंभरपैंकी शंभर मार्क मिळवत उत्तीर्ण झाली, तिला डॉक्टर व्हायचंय.... गेली वीस वर्षं नंदिनी हरिनाथ इस्रोत शास्त्रज्ञ आहेत. दोन हजारांच्या नव्या नोटेवर आलेला मंगळयानाचा फोटो पाहून सर्वाधिक आनंद झाल्याचं त्या आवर्जून सांगतात...
अनुराधा टी के, इंजिनिअर, इस्रो
इस्रोतल्या सगळ्यात वरिष्ठ शास्त्रज्ञाचा मान मिळतो तो अनुराधा टी के यांना... उपग्रह अवकाशात पाठवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो... गेली 34 वर्षं त्या इस्त्रोत इंजिनिअर आहेत. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉँग ही अनुराधा यांची पहिली प्रेरणा... त्यावेळी अनुराधा फक्त नऊ वर्षांच्या होत्या. आणि त्यावेळी त्यांनी नील आर्मस्ट्रॉँगवर कन्नडमध्ये कविताही केली होती. 1982 साली त्या इस्रोमध्ये रुजू झाल्या. त्यावेळी इस्रोमध्ये फक्त पाच ते सहा महिला इंजिनिअर्स होत्या. आताच्या घडीला इस्रोमध्ये 16 हजार महिला शास्त्रज्ञ आणि कर्मचारी आहेत.
मंगळयान मोहिमेदरम्यान सगळ्याच कर्मचाऱ्यांना दिवसातले चौदा-पंधरा तास काम करावं लागत होतं. मोहिम शेवटच्या टप्प्यात असताना घरी जाणंही कठीण होतं... तरीही या तिघींसह इस्रोच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतली... घर, संसार, मुलं आणि करिअर सांभाळताना घरातून भक्कम पाठिंबा हवा, असं या तिघी आवर्जून सांगतात. या तिघींना वुमन फ्रॉम मार्स म्हटलं जात असलं तरी तिघींचेही पाय जमिनीवर आहेत... 'स्काय इज द लिमिट' त्यांनी कधीच पार केलंय... त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांना अजून अनेक ग्रह, ताऱ्यांना आणि आकाशगंगांना गवसणी घालायचीय...