बंगळुरू : रस्त्यात झालेल्या अपघाताने शरीराचे दोन तुकडे झाल्यावरही आणि मृत्यू समोर असतांनाही या तरुणाने शेवटच्या श्वासाला आपल्या अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाने व्यक्त केलेली इच्छा ऐकून सध्या कर्नाटकवासियांचे डोळे पाणावले आहेत. हरीश नानजप्पा असे या २३ वर्षीय तरुणाचे नाव आहे. 


बंगळुरुत नोकरी करणारा हरीश काही कामानिमित्ताने त्याच्या गावी गेला होता. गावाहून परतताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर एका ट्रक ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याच्या नादात हरीशला धडक दिली. हरीशचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला आणि ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. हेल्मेट घातलेले असल्याने त्याच्या डोक्याला मार बसला नाही. परंतु, त्याच्या शरीराच्या खालील भागातील त्वचा, हाडे आणि पाय इतर भागांपासून वेगळे झाले.


ही घटना पाहताच काहींनी पोलिसांना फोन केला. रस्त्याच्या टोलचे कंत्राट पाहणाऱ्या कंपनीने ६ मिनिटात अॅम्ब्युलन्स पाठवली. पण, आपण काही वाचणार नाही याचा अंदाज हरीशला कदाचित आला असावा आणि डोळे बंद होण्याआधीच त्याने अवयवदानाची इच्छा व्यक्त केली.


हॉस्पिटलमध्ये नेतांना वेदनेने कळवळणाऱ्या हरीशने आपले शक्य तितके अवयव दान केले जावे, अशी इच्छा उपस्थित लोकांकडे बोलून दाखवली.  गोष्ट लोकांनी डॉक्टरांना सांगितली. हे ऐकून डॉक्टरांना सुद्धा धक्काच बसला. हरीशचा मृत्यू झाल्यावर त्याच्या इच्छेप्रमाणे डॉक्टरांनी त्याचे डोळे काढून घेतले आणि ते हॉस्पिटलच्या ताब्यात दिले.


ट्रकचालक वरदराज याला अटक करण्यात आली आहे. हरीशच्या कुटुंबियांनी त्याच्या जन्मगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मात्र सर्वांनाच हेलावून टाकले आहे. अवयवदानासारख्या पवित्र कार्यात हरीश नानजप्पाने एक आदर्श घालून दिला आहे.