कुलभूषण यांना अटक कुठून आणि कशासाठी केली?- भुत्तोंचा सवाल
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल अली भुत्तो यांनी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या मृत्युदंडावर टीका केली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल अली भुत्तो यांनी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या मृत्युदंडावर टीका केली आहे.
कुलभूषण यांना पाकिस्ताननं नेमकी कुठून अटक केली, कशासाठी केली, याबाबत संभ्रमाचं वातावरण असल्याचं बिलावल भुत्तोंनी म्हटलं आहे.
जर कुलभूषण जाधव रॉचे एजंट असल्याचा पुरावा पाकिस्तान सरकारकडं किंवा सैन्याकडं असता, तर या गोष्टीचा त्यांनी जागतिक स्तरावर चांगलाच बोभाटा केला असता.
मात्र ज्या गुप्तपणे सरकारनं हे प्रकरण हाताळलं, त्यावरून संशयाला जागा असल्याचं भुत्तोंनी म्हटलं आहे. मुळात मृत्युदंडाच्या शिक्षेला आपला तत्वतः विरोध असल्याचंही भुत्तोंनी म्हटलं आहे.
आपले आजोबा झुल्फिकार अली भुत्तोंनाही मृत्युदंड देण्यात आला होता. तेव्हापासून पाकिस्तान पीपल्स पार्टीची भूमिका मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या विरोधात असल्याचं भुत्तोंनी म्हटलं आहे.