कार चालक म्यानमार देशाच्या अध्यक्षपदी
लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यूकी यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांचे कार चालक असलेले तिन क्याव यांची आज मंगळवारी म्यानमारच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नैपिताव, म्यानमार : लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यूकी यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांचे कार चालक असलेले तिन क्याव यांची आज मंगळवारी म्यानमारच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तिन क्याव यांना संधी मिळण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. स्यूकी यांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत. त्यामुळे त्यांनाच संधी मिळणार, असे वृत्त आधी देण्यात आले होते.
स्यूकी यांनी क्याव यांचे नाव जाहीर केल्यानंतर संसदेतील कनिष्ठ सभागृहात त्यावर मतदान घेऊन शिक्कामोर्तब करण्यात आले. म्यानमारमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत स्यूकी यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले होते. त्यामुळे स्यूकी यांनी अध्यक्षपदासाठी सुचविलेल्या क्याव यांना सभागृहात विजय मिळविणे सहज शक्य झाले.
क्याव यांना दोन्ही सभागृहात मिळून ६५२ पैकी ३६० मते मिळालीत. आज अध्यक्षपदासाठी विश्वास दर्शक प्रस्ताव वरिष्ठ सभागृहात मांडण्यात आला होता. दोन्ही सभागृहांत पक्षाची ताकद असल्याने ठराव मंजूर होणे म्हणजे केवळ औपचारिकता होती.
दरम्यान, देशात १९६२ मध्ये म्यानमारची सूत्रे लष्कराने ताब्यात घेतली. त्यानंतर यंदा ५४वर्षांनी प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेवर आलेय.