वॉशिंग्टन : अमेरिकेत आणखी एका भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आली आहे. त्याआधी अमेरिकेतील कन्सासमध्ये भारतीय तरुणाची वर्णभेदातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनिश पटेल या भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. दक्षिण कॅरोलिनात गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे.


पटेल यांनी गुरुवारी रात्री ११.२४ वाजताच्या सुमारास लँकास्टरस्थित आपले दुकान बंद केले. त्यानंतर दहा मिनिटांनी पटेल यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. 


उद्योजक पटेल यांच्या हत्येप्रकरणाचा तपास सुरू आहे, असे लॅँकास्टर येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पटेल यांच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही हत्या वर्णभेदातून झाली नसावी, असे पोलीस प्रमुख बॅरी फेली यांनी स्पष्ट केले आहे.


कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या वर्णभेदातून झाल्याचे स्पष्ट झाले होते. श्रीनिवास आणि अलोक मदासानी हे दोघे एका बारमध्ये बसलेले होते. अमेरिकन नौदलातील माजी अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या देशातून चालता हो असे म्हणत त्याने गोळीबार केला. 


दरम्यान, कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची वंशभेदातून हत्या झाल्याच्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला होता.