लॉस एन्जेलिस : गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडचं अख्खं तारांगण लास वेगासमध्ये अवतरलं होतं. या सगळ्या तारे तारकांच्या गर्दीत सगळ्यात जास्त चमकली ती मेरील स्ट्रीप....


नाव न घेता 'ट्रम्प' यांचे वाभाडे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही  मेरील स्ट्रीपला विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिनं केलेल्या भाषणानं सगळेच आवाक झाले. सहा मिनिटांच्या तिच्या भाषणात तिनं अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली. पण विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे नाव तिनं एकदाही घेतलं नाही.... 


डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांविरोधातलं धोरण जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या धोरणावर टीका करताना विविध देशांतून आलेल्या अभिनेत्यांनी हॉलिवूड कसं समृद्ध केलं, याचे दाखले मेरीलनं दिले. 


भाषणाची सुरुवात अत्यंत हळुवारपणे करुन तिनं उपस्थितांना हळूहळू अत्यंत गांभीर्यानं विचार करायला भाग पाडलं. डोनल्ड ट्रम्प यांनी एका अपंग पत्रकाराची नक्कल केली होती, त्याचंही उदाहरण मेरीलनं दिलं.  


मेरीलचं सहा मिनिटांचं भाषण अत्यंत टोकदार पण तितकंच संयमित आणि प्रगल्भ होतं... जे खटकलं ते स्पष्टपणे मांडण्याचं धाडस तिनं दाखवलं... आणि अमेरिकन जनतेला पुढे काय वाढून ठेवलंय, याची जाणीव करुन दिली.



काय म्हटलंय मेरीलनं आपल्या भाषणात...


'हॉलिवूड म्हणजे काय? वेगवेगळ्या देशांतून लोक इथं येतात... म्हणून त्याला महत्त्वाचं ठरतं...  अ‍ॅमी अ‍ॅडम्सचा जन्म इटलीतल्या व्हिसेन्झाचा, नताली पोर्टमन जन्मली ती जेरुसलेममध्ये... भारतीय वंशाचा देव पटेल केनियात जन्मला आणि लंडनमध्ये वाढला.... हॉलिवूड विविधतेला महत्त्व देत आलंय... जर या लोकांना काढून टाकलं तर लोकांकडे फुटबॉल व मार्शल आर्ट्सशिवाय पाहण्याशिवाय पर्याय उरणार नाही... यावर्षी वेगळा ठरला तो अमेरिकेतील सर्वात उच्चपदस्थ (डोनाल्ड ट्रम्प) व्यक्तीचा अभिनय... त्यांनी एका अपंग वार्ताहराची थट्टा करणारी नक्कल केली. हे त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीला शोभणारं नाही... त्यांचे हे कृत्य पाहताना माझं मन विदिर्ण झालं होतं... ही गोष्ट माझ्या डोक्यातून कधीही पुसली जाणार नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तीनं असं केल्यानं ते समाजात पोहोचू शकत नाहीत... उलट इतरांनाही तसंच करण्याची परवानगी आहे, असंही वाटू शकतं. अनादराला उत्तर अनादरानेच मिळतं... हिंसेतून हिंसा जन्मते... उच्चपदस्थ व्यक्ती अशा प्रकारे इतरांची थट्टा करते तेव्हा ते अयोग्यच आहे' असं मेरील हिनं आपल्या भाषणात म्हटलंय. 


सेलिब्रिटींचा पाठिंबा पण,


मेरीलच्या या भाषणानंतर अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत तिला पाठिंबा दिलाय. आणि अपेक्षेनुसार डोनल्ड ट्रम्प यांनी मेरीलला हिलरीप्रेमी आणि पात्रता नसणारी अभिनेत्री म्हणत हिणवलंय.


या भाषणात तिनं उपस्थितांना आधी हसवलं, मग रडवलं आणि शेवटी गांभीर्यानं विचार करायला भाग पाडलं..... मेरील स्ट्रीपचे आतापर्यंत आयर्न लेडी, डेव्हिलविअर्स प्राडा, ब्रिजेस ऑफ मॅडिसन कंट्री या सिनेमातले परफॉर्मन्स प्रचंड गाजले... पण गोल्डन ग्लोबमधला हा सहा मिनीटांचा परफॉर्मन्स अख्ख्या जगाला थक्क करणारा होता... 





कोण आहे मेरील स्ट्रीप...


हॉलिवूडची ही 67 वर्षांची अभिनेत्री... अमेरिकेतली सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.... हॉलिवूडमधली सगळ्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करची ती चार वेळा मानकरी ठरलीय. तर मिनी ऑस्कर अर्थात गोल्डन ग्लोब पुरस्कार तिनं तब्बल आठ वेळा पटकावलाय.