तेव्हा आम्ही वाजपेयींच्या पाठीत खंजीर खुपसला - नवाझ शरीफ
अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली.
इस्लामाबाद : कारगिलमध्ये १९९९ साली घुसखोरी ही पाकिस्तानची चूक होती, आम्ही असे करुन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठित खंजीर खुपसला होता, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिली.
कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली, तेव्हा नवाझ शरीफच पाकिस्तानचे पंतप्रधान होते. कारगिल युध्दाबद्दल शरीफ यांना अशी अचानक उपरती होण्यामागे राजकारण असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पठाणकोट येथील वायू दलाच्या तळावर हल्ला करणाऱ्या जैशच्या अतिरेक्यांविरोधात पाकिस्तानने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
तसेच डेव्हीड हेडलीच्या कबुलीजबाबाने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडले आहे. अशावेळी भारतासोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी काही पावले मागे येत नमते घेतले असावे असे राजकीय तज्ञांनी सांगितले.
पठाणकोट येथील भारतीय वायू दलाच्या तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. व्दिपक्षीय चर्चा सुरु करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होत असताना शरीफ यांनी ही कबुली दिली आहे.