पाकिस्तानमध्ये नोटबंदी, 5000च्या चलनी नोटा रद्द
पाकिस्तानच्या राज्यसभेत देशातल्या 5000च्या चलनी नोटा रद्द टप्प्या टप्प्यानं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
इस्लामाबाद : भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं जगभरातून अनुकरण व्हायला सुरूवात झाली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सोमवारी पाकिस्तानच्या राज्यसभेत देशातल्या 5000च्या चलनी नोटा रद्द टप्प्या टप्प्यानं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी हा ठराव मंजूर करण्यात आलाय. पाकिस्तान मुस्लिम लीगचे खासदार उस्मान सैफउल्ला खान यांनी सीनेटमध्ये हा मांडला. येत्या तीन ते पाच वर्षात या नोटा रद्द करण्यात याव्यात असं या प्रस्तावात म्हटले आहे. पण पाकिस्तानच्या कायदा मंत्र्यांनी मात्र या निर्णयामुळे बाजारात मोठी कोंडी होण्याची भीती व्यक्त केली.
सध्या पाकिस्तानच्या बाजारात 3.4 दश अब्ज नोटा चलनात आहेत. त्यापैकी 1 .02 दशअब्ज नोटा 5 हजाराच्या आहेत. त्या जर चलनातून रद्द झाल्या देशात अनागोंदी माजेल असं पाकिस्तानाच्या कायदा मंत्र्यांना वाटतंय. तरीही पाकिस्तानी सीनेटनं हा प्रस्ताव जवळपास एकमतानं मंजूर केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे.