सिंधूचं पाणी रोखलं तर आम्हीही कारवाई करु- पाकिस्तानची भारताला धमकी
पाकिस्तानची भारताला धमकी
इस्लामाबाद : सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली. भारताने दहशवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकट पाडण्याचं जगाला आवाहन केलं. या मुद्द्यावर भारताला अनेक देशांनी पाठिंबा दर्शवला. तरी पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवाया सुरुच आहे. त्यामुळे भारताने सिंधू जल करार मोडून पाकिस्तानचं पाणी थांबवण्याचा देखील इशारा दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने जर सिंधूचं पाणी थांबवलं तर पाकिस्तान देखील कारवाई करेल असं त्यांनी म्हटलं आहे. पण ती कारवाई काय असेल याबाबत त्यांनी काहीही सांगितलं नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीस जकारियाने म्हटलं की, 'जर सिंधू जल करारमध्ये कोणताही अडथळा आला तर पाकिस्तान देखील कारवाई करेल. भारत हा काश्मीरमध्ये सुरु असलेल्या घटनांपासून जगाचं दुर्लक्ष करु इच्छित आहे.'
पाकिस्तानला एकटं पाडण्याचे प्रयत्न व्यर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारताने SAARC चा वापर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी केला. पाकिस्तानी कलाकारांसोबत भारताने केलेला व्यवहार निराशाजनक आणि खेदपूर्ण असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.