इस्लामाबाद : पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन करण्यात आल्याची चर्चा शहरात लागलेल्या पोस्टर्सवरून सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं , असं आवाहन करणारे पोस्टर्स  शहरात झळकरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातील १३ शहरांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. लाहोर, कराची, पेशावर, रावळपिंडी, फैसलाबाद, सरगोधा आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये एका रात्रीत हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.  या पोस्टर्समधून लष्कर प्रमुख राहील शरिफ यांना लष्करी कायदा लागू करण्याचं आवाहन करण्यात आलंय. 
     
'मुव्ह ऑन पाकिस्तान' या पक्षाने हे पोस्टर्स लावले आहेत. याच पक्षाने लष्कर प्रमुख राहील शरिफ यांना निवृत्तीवर फेरविचार करण्यासाठी मोहीम सुरु केली होती, असं वृत्त पाकिस्तानी दैनिक डॉनने दिलं आहे.


लष्कराचं मुखपत्र 'द इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स'ने मात्र यावर कोणतंच भाष्य केलेलं नाही. पण या बॅनर्समुळे काहीतरी शिजत आहे अशी शंका अभ्यासक अमीर राना यांनी व्यक्त केली आहे. बॅनर्स लागलेल्या अनेक ठिकाणी कडक- सुरक्षाव्यवस्था असतानाही बॅनर्स कसे लागले यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये लष्करी छावणी परिसराचादेखील समावेश आहे. 
     
'जाने की बात हुई पुरानी, खुदा के लिए अब आ जाओ', असं या पोस्टरवर लिहिण्यात आलंय, 'लष्कर प्रमुखांनी लष्करी कायदा लागू करुन सरकार स्थापन करावं, या सरकारमध्ये तज्ञांचा समावेश असावा', असं पक्षाचे प्रमुख  संयोजक अली हाश्मी यांनी डॉन वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. राहील शरीफ यांनी स्वत: या सरकारच्या कारभारावर नजर ठेवावी असं ही अली हाश्मी बोलले आहेत.