हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होणार?
हिलरी रॉटडेम क्लिंटन हे नाव जगाला नवीन नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहेत.
नवी दिल्ली : हिलरी रॉटडेम क्लिंटन हे नाव जगाला नवीन नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहेत.
हिलरी क्लिंटन यांना मिळणारा हा प्रतिसाद डेमोक्रॅटिक पक्षाला चांगलाच दिलासा देणारा ठरतोय. कारण गेल्या दोन तीन आठवड्यात अचानक हिलरी क्लिंटन यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची घट झालीय. डॉनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं वाढणारी मतं यामुळे हिलरी क्लिंटन जिंकता जिंकता हरतात की काय अशी स्थिती निर्माण झालीय. त्यामुळेच की काय प्रचाराच्या शेवटच्या काही तासांत हिलरींनी सेलिब्रिटींची साथ घेऊन ट्रम्प यांना शह देण्याचे अथक प्रयत्न चालवलेत.
इथपर्यंतचा प्रवास नव्हता सोप्पा...
हिलरी क्लिंटन यांचा चेहरा अमेरिकन सत्ताकारणात गेल्या दोन तीन दशकात सातत्यानं चर्चेत राहिलाय. पती बिल क्लिंटन राष्ट्राध्यक्ष असताना गाजलेलं मोनिका ल्युवेन्स्की प्रकरण आणि जगभरात झालेली नाच्चकी यामुळे क्लिंटन दाम्पत्य सर्वांच्या लक्षात राहिलंय. मधली आठ वर्ष जॉर्ज बुश यांच्या कालखंडात अमेरिकेत बोकाळलेली युद्धखोरीची प्रवृत्ती बराक ओबामांनी आपल्या पहिल्या कालखंडात बदलली. तेव्हा परराष्ट्र खात्याचा भार हिलरी क्लिंटन यांच्या खांद्यावर होता.
अमेरिकेचं परराष्ट्र खातं म्हणजे दुधारी तलवार... सुपर पॉवर म्हणून जगात मिरवताना आपल्या देशाचं हीत कायम सर्वोच्च स्थानी ठेवणं, हे कसब त्या पदावर बसणाऱ्याला अंगी बाणावावं लागतं. हिलरींनी ते बाणवलं आणि आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या अमेरिकेचा वकूब परराष्ट्रीय नीतीच्या बाबतीत कमी होऊ दिला नाही. हे त्यांच्या परराष्ट्र सचिवपदाच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. पण इतक्यावर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढणं आणि ती जिंकणं हे सोपं नाही. त्यात अमेरिकेतला बहुतांश ख्रिश्चन समाज अत्यंत कर्मठ मानला जातो. डेमोक्रॅटिक विचारसरणी त्यामानानं काहीशी मवाळ मतवादी आहे. त्यामुळे या समाजाच्या एखादी महिला उमेदवार पसंतीस पडणं आणि इथपर्यंत पोहचणं हेही नसे थोडके...
पक्षातूनच विरोध
हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला डेमोक्रॅटिक पक्षातूनच मोठा विरोध होता. पण अमेरिकेतल्या प्रीलिमनरीज संपता संपता हा विरोध मावळला. त्यामुळे क्लिंटन यांचा मार्ग सोपा झालाय असं चित्र दोन आठवड्यांपूर्वी पर्यंत होतं. त्याला हिलरी क्लिंटन यांच्याकडे असणारे काही गुण कारणीभूत ठरले.
जमेच्या बाजू...
- अमेरिकेत महिला मतदारांची संख्या तब्बल ५३ टक्के आहे
- डॉनाल्ड ट्रम्प यांच्या चारित्र्याविषयी महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्यात क्लिंटन यांच्या प्रचार यंत्रणेला मोठं यश आलं
- अमेरिकची फर्स्ट लेडी म्हणून हिलरी क्लिंटन हा लोकमान्य चेहरा आहे. शिवाय राष्ट्रध्यक्षच्या कामाची पद्धत, जबाबदाऱ्या याचीही क्लिंटन यांना जवळून ओळख आहे
- परराष्ट्र खातं सांभाळल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात हिलरी क्लिंटन यांचं नाव प्रसिद्ध आहे
विरोधी बाजू...
- हिलरी क्लिंटन यांच्याकडे जसे गुण आहेत तसे अनेक अवगुण देखील आहेत.
- निर्णय क्षमतेचा अभाव असल्याची टीका हिलरी क्लिंटन यांच्यावर डेमोक्रॅटिक पक्षाच्याच अनेक उमेदवारांनी केलीय
- पराराष्ट्र सचिव असताना खाजगी मेलवरून गोपनीय माहित पाठवल्याचा आरोप हिलरींवर करण्यात आलाय
- हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन चारित्र्याविषयी अनेक सुरस कथा अमेरिकेत आजही चवीनं चघळल्या जातात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चारित्र्यावर भाष्य करण्याचा हिलरींना काय अधिकार? असा विरोधकांचा सवाल आहे.
- दोनच आठवड्यांपूर्वी हिलरींच्या प्रचार यंत्रणेच्या सूत्रधार हुमा अबेदिन यांच्या पतीच्या अश्लील वर्तनाचे पुरावे अमेरिकन मीडियाला सापडलेत. त्यामुळे हिलरींच्या प्रचार यंत्रणेला मोठा धक्का बसला.
२०१६ ची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही दोन अयोग्य उमेदवारांमधला संघर्ष असल्याचं तिथल्या राजकीय विश्लेषकांचं मत आहे. प्रचारा दरम्यान दोन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्याच्या वैयक्तिक नालस्तीची परिसीमा गाठलीय. त्यातल्या त्यात हिलरी क्लिंटन यांची सकारात्मक बाजू म्हणजे, त्यांना सत्ताकारणाचा असणारा अनुभव आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायविषयी त्यांनी उठवलेला आवाज... या दोन बाबींमुळे येत्या आठ तारखेला हिलरी क्लिंटन 'वासरातली लंगडी गाय' ठरण्याची शक्यता आहे.