भारताबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यानं पाकिस्तानी कलाकाराची हकालपट्टी
भारत आणि भारतीयांबद्दल वादग्रस्त ट्विट पाकिस्तानच्या कलाकाराला चांगलंच भोवलं आहे.
लंडन : भारत आणि भारतीयांबद्दल वादग्रस्त ट्विट पाकिस्तानच्या कलाकाराला चांगलंच भोवलं आहे. पाकिस्तानी असलेल्या मार्क अन्वरनं भारताविषयी आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. यानंतर मार्क अन्वरची ब्रिटनमधल्या मालिकेमधून हकालपट्टी झाली आहे.
आयटीव्ही या ब्रिटनच्या चॅनलनं हा निर्णय घेतला आहे. मार्कचं हे ट्विट अत्यंत चुकीचं आणि वर्णद्वेषी असल्याचं स्पष्टीकरण आयटीव्हीनं दिलं आहे.
जगातली सर्वात जास्त काळ चालणारी मालिका कोरोनेशन स्ट्रीट या मालिकेमध्ये मार्क काम करत होता. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जावं, असा इशारा मनसेनं दिला होता. या मुद्द्यावरून मार्कनं ट्विट केलं होतं.
भारताकडून काश्मीरमधल्या आमच्या बांधवांवर अत्याचार होत आहेत. पाकिस्तानी कलाकारांना भारतात जाऊन काम करायची गरज काय असा सवाल मार्कनं विचारला होता. हे ट्विट करताना मार्कनं अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. मार्क अन्वरनं हॉलीवूड चित्रपट कॅप्टन फिलिप्स आणि 51st स्टेट या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.