मुंबई : सैराटचं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने रिव्ह्यू सोशल मीडियावर लिहितो आहे. सैराटचं अनेक जणांनी कौतुक केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली वेगळी ओळख असलेला अभिनेता जितेंद्र जोशी यांनी ‘सैराट’बद्दल लिहिलं आहे.


जितेंद्रची पोस्ट जशीच्या तशी 


सैराट चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून आजतागायत पाहण्याची संधी हुकत गेली. आज जमलं. सैराट बद्दल खूप काही बरं आणि वाईटहि बोललं गेलंय आणि बोललं जाईलही. काही लोक सैराट बद्दल "आम्हाला काहीच बोलायचं नाहिये" असं म्हणून बोलताहेत, लिहिताहेत.



आज सैराट चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांसोबत पाहिला आणि जे जाणंवलं ते- तरुण वयात एकमेकांच्या प्रेमात पडणारं युगुल आणि त्यांना होणारा विरोध हा अनेक हिंदी सिनेमांना आणि पर्यायाने लेखक , दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे संसार चालावणारा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा विषय!



नागराजनं तीच सरधोपट कथा घेऊन सिनेमा रचला आणि बनवला देखील. परंतु त्याने पात्र रचना करताना इतर सिनेमात वापरतात तशी पात्रांची "जात" फक्त तोंडी लावण्यापुरती वापरली नसून तो त्यातून आपल्याला अतिशय खोलवर रुजलेली आणि दुर्दैवाने अजूनही अबाधित असलेली हिंसा दाखवतो, अगतिकता मांडतो, परिकथेतील प्रेमाला वास्तवाची झळ सोसताना बघतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वातून तो उघड उघड अस्पृष्यतेवर, अस्वीकारावर भाष्य करतो. त्याच्या पात्रांच्या प्रेमाला अजय अतुल च्या संगीताची मोलाची साथ मिळाली आहे आणि सोबत सिनेमा या तंत्रावर नागराज ची स्वतः ची हुकूमत /सौन्दर्यदृष्टि किती परिणामकारक आहे हे पुन्हा अधोरेखित झालं.


सर्व कलाकारांचा अभिनय हा अभिनय न वाटता पात्रं खरी वाटतात . रिंकु राजगुरु ने तर डोळ्यांचं पारणं फिटवलं. परंतु या सर्वांच्या पलीकडे नागराज मंजूळे नावाचा लेखक आणि त्याने पाहिलेलं/जगलेलं आयुष्य या सर्वांपेक्षा वर तरंगत राहतं. आपल्याकडे अनेक ग्रामीण चित्रपट झालेत आणि होताहेत परंतु नागराजने त्याच्या गावच्या , माणसांच्या मातीची नेत्रादिपक कथा आपली सर्वाची केली आणि केवळ म्हणूनच त्याला व्यावसायिक यश मिळालं आणि त्याचा मला सर्वाधिक आनंद वाटतोय.


नागराजच्या कविता हा एक वेगळा विषय आहे. खरंतर त्याला त्याच्या एक एक कवितेवर सिनेमा करायचा झाला तर एक जन्म अपुरा पडेल परंतु त्याचा हट्टी स्वभाव आणि समाजातला अभाव त्याने हेरुन सिनेमा या माध्यमाला जवळ केलं ते बरंच झालं कारण यातून होणारी निष्पत्ति जास्त लोकांपर्यंत पोहोचुन त्याचे परिणाम होतील अशी मी अपेक्षा करतो. नगर जिल्ह्यातील एका दलित मुलानं सवर्ण मुलीवर प्रेम केलं आणि त्याच्या घरादाराला तुकडे करून संपवण्यात आलं आणि अशा अनेक विदारक घटना घडल्या आणि आपण वर्तमानपत्रांतून असे विषय चघळून हातावेगळे आणि डोक्यावेगळे केले. मला आज तोच त्रास झाला जो ती बातमी वाचताना झाला होता परंतु आश्वासकही वाटले की आता असे विषय मांडणारा एक कलाकार आम्हाला मिळाला.


कला दुःखातून जन्माला येते असं ऐकलंय नाग्या तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो आणि ती आमची होवो. तुझ्या परश्या आणि आर्ची सोबत साथ देऊन जीवाला जीव देणाऱ्या लंगड्याचं धैर्य आणि मित्रता आमच्या पांगळ्या अस्मितेला आणि दिवाणखान्याला येवो. साखरझोपेत असणाऱ्या आमच्या तकलादु स्वप्नाना तुझ्या जळजळीत वास्तवाने जाग येवो. तू वाचलेल्या प्रत्येक /कित्येक पुस्तकांचा हा सत्कार आहे. खड़ी फोडून राठ झालेल्या तुझ्या आईबापाच्या हातांना तू जातीच्या आणि भीमराव, फुलेंचे फक्त फ़ोटो मिरावणाऱ्या भिंतीना फोडण्याची दिलेली संधी आहे. 


तू यशाला जुमानु नकोस आणि काम करत रहा
तुला माझं आयुष्य लाभो 
आणि मला बाबासाहेबांची पुस्तकं.


जितेंद्रची ओरिजनल पोस्ट...