अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन
अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात निधन झाले.
मुंबई : अभिनेत्री रिमा लागू यांचे कोकीलाबेन रुग्णालयात निधन झाले. गेली चार दशकं मराठी, हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयनं जबरदस्त ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचं आज निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. आज कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी दोन वाजता ओशिवरा स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यंस्कार होणार आहेत. या बातमीनं सिने आणि नाट्य सृष्टीवर शोककळा पसरलीय.मराठीसह हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन शोमध्ये काम केले आहे, जवळपास चार दशके मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले. मराठी धारावाहिका तुझ माझं जमेना यात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली.
रिमा लागू यांचा ३ फेब्रुवारी जन्म १९५८ साली झाला. श्रीमांत श्रीमंती, तू तू मैं मैं या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. नयन भडभडे या पूर्वाश्रमीच्या व रीमा लागू या लग्नानंतरच्या. सुमारे चार दशकांचा चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील अनुभव असलेल्या रिमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले आहे. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन..!, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मैं मैं या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम विशेष गाजले आहे.
मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रिमा लागू झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव मृण्मयी लागू आहे.
बॉलिवूडची ‘फेव्हरेट मॉम’ म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता सलमान खान, अभिनेत्री काजोल आणि माधुरी दीक्षित आदींसोबत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली होती. रिमा यांच्या अचानक जाण्याने सिनेमा क्षेत्रातील आई हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘आई शप्पथ’, ‘बिंधास्त’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’ यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.