दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर `ए दिल है मुश्किल`च्या अडचणी वाढल्या
करण जोहर दिग्दर्शित `ए दिल है मुश्किल` हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, उरी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या अडचणींत वाढ होणार असं दिसतंय.
मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, उरी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या अडचणींत वाढ होणार असं दिसतंय.
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसे आक्रमक झालीय. ४८ तासांत पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जावं अन्यथा जिथे असाल तिथे घुसून मारु, असा इशाराच मनसेनं दिलाय. 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खानदेखील प्रमुख भूमिकेत दिसतोय.
करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात फवादसोबतच ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. फवादची भूमिका छोटी असण्याची शक्यता असली तरी तो टीझरमध्ये दिसतोय. फवादनं यापूर्वी करणच्या 'कपूर अॅन्ड सन्स' या सिनेमातही काम केलंय.
भारतात पाकिस्तानी कलाकारांना अनेकदा विरोध झालाय. नुकत्याच झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर हा विरोध आणखीन तीव्र झालाय. या अगोदर शाहरुख खानच्या 'दिलवाले' या सिनेमावरही बहिष्कार टाकण्यात आला होता. त्याचा चांगलाच फटका बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला बसला होता.
'ए दिल है मुश्किल' या सिनेमाला अगोदरच अजय देवगनच्या 'शिवाय' या सिनेमाकडून टफ फाईट मिळतेय. त्यात आता दहशतवादाचा आणि पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा करणची डोकेदुखी वाढवणार असं दिसतंय.