मुंबई : मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने मिळविला. 


यंदाचा विशेष लक्षवेधी नाटकाचा पुरस्कार ‘कोडमंत्र’ नाटकाने मिळवला. प्रायोगिक नाटकांमध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट नाटकासहित आठ पुरस्कार मिळवित ‘हे राम’ या नाटकाने बाजी मारली. या सोहळ्याचा परमोच्च क्षण ठरला तो जीवन गौरव पुरस्कार प्रदानाचा. आपल्या संवेदनशील आणि प्रगल्भ अभिनयाने मराठी रंगभूमीला एकाहून एक सरस नाट्यकृती देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ‘झी नाट्य जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. विख्यात नाटकांचे निवडक प्रवेश, बहारदार नृत्याविष्कार आणि विनोदी प्रहसने यांनी रंगलेला हा नाट्यगौरव सोहळा येत्या ९ एप्रिलला झी मराठीवर सायंकाळी ७ वा. प्रसारित होणार आहे.


मराठी रंगभूमीवर विविध प्रयोग होताना दिसतायत. जुन्या जाणत्या कलाकारांची आणि लेखक दिग्दर्शकांची एक फळी इथे कार्यरत आहेच पण सोबतीने आजच्या पिढीचे विषय मांडणारी, नवा विचार सांगणारी नव्या कलाकारांची, लेखकांची आणि दिग्दर्शकाचीही एक सशक्त अशी नवी फळी तयार होत आहे. 


या सर्वांच्या कामाची, मेहनतीची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा झी नाट्य गौरव सोहळा २०१७ मोठ्या थाटामाटात मुंबईतील भाईदास सभागृहात संपन्न झाला. यावर्षी ‘तीन पायांची शर्यत’, ‘कोडमंत्र’, ‘एक शून्य तीन’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकांनी विविध विभागांत नामांकने मिळवित स्पर्धेत रंगत आणली होती.


यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री शर्वरी लोहकरे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय केंकरे असे महत्त्वाचे पुरस्कार पटकावित ‘तीन पायांची शर्यत नाटकाने’ या सोहळ्यावर आपली छाप सोडली. प्रायोगिक नाटकांत सर्वोत्कृष्ट अभिनेता निशांत कदम , अभिनेत्री तेजस्वी परब, दिग्दर्शक राम दौंड आणि सर्वोत्कृष्ट नाटक या महत्त्वांच्या पुरस्कारांसहित इतर चार पुरस्कारांवर आपले नाव कोरत ‘हे राम’ नाटकाने एकहाती बाजी मारली.


कार्यक्रमाचा परमोच्च क्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्काराचा. ‘बॅरिस्टर’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘महासागर’, ‘जास्वंदी’, ‘कमला’ ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’ अशा एकाहून एक सरस आणि दर्जेदार नाटकांमधून आपल्या सशक्त अभिनयाचा नजराणा नाट्यरसिकांना देणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते नाट्यजीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विक्रम गोखले म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी मी नाटकांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला असला तरी मी अभिनयापासून दूर झालेलो नाही. चित्रपट आणि टीव्ही मालिका या माध्यमांतून मी तुमच्या भेटीला येत राहीन. माझ्यातील अभिनेता जिवंत ठेवण्यासाठी मला सतत काम करायलाच पाहिजे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करेन. आज विविध नामांकित विद्यापीठे आणि कलेशी निगडीत महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे काम मी करत आहे. तिथे असलेले विद्यार्थी असो की आता माझ्यासमोर बसलेले तुमच्यासारखे आजच्या पिढीतील नव्या दमाचे कलाकार असो या सर्वांबद्दल मी प्रचंड आशावादी आहे. आज हा झी नाट्यजीवन गौरव पुरस्कार देऊन माझा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी झी मराठीचा आभारी आहे.”


अतिशय रंगतदार पद्धतीने सजलेल्या या सोहळ्यात गायिका प्रियंका बर्वे आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी ‘संगीत मानापमान’ मधील प्रवेशासहित पदे सादर केली. तर पुष्कर श्रोत्रीने सादर केलेले ‘एकच प्याला’मधील तळीरामाचे स्वगत, डॉ. अमोल कोल्हे यांनी सादर केलेले ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’मधील संभाजी राजांचे स्वगत प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. भरत जाधव आणि सहका-यांनी सादर केलेला ‘सही रे सही’ मधील एक प्रवेश प्रेक्षकांना खळखळून हसवून गेला. वंदना गुप्ते आणि पुष्कराज चिरपुटकर यांचं खुमासदार निवेदन आणि इतर अनेक देखण्या कलाविष्कारांनी सजलेला हा सोहळा येत्या ९ एप्रिलला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.