मुंबई : टीव्हीवर चालणाऱ्या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिअॅलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल तर आता तुमच्यासाठी एकता कपूर आणतेय भन्नाट वेब सीरीज... एकताच्या 'ऑल्ट बालाजी' प्रोडक्शन 'बॉयगिरी' ही मालिका, मैत्री, मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा यावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नावाप्रमाणेच 'बॉयगिरी' मालिका आपल्याला ब्रोमॅन्सच्या विश्वात घेऊन जाते. एकत्र राहताना त्यांच्यातला घट्ट होत जाणारा ऋणानुबंध, त्याचवेळी 'मेन नेव्हर ग्रो अप' या तत्वावर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं, पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका पाहताना प्रत्येक पुरूषाला त्याच्या स्वत:च्या तरूणपणीच्या मित्रांची आठवण नक्कीच होईल.


या 'बॉयगिरी'मध्ये प्रनवेश, अद्वैत, मनज्योत, जतीन, रवी आणि बंदा अशी काही मनोरंजक पात्र दिसणार आहेत. या सगळ्या मित्रांची मालिका दर एपिसोडगणिक मजेदार होत जाताना दिसेल. काही गंमतीशीर घटना क्रमामध्ये अडकल्यावर व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने या मालिकेतली पात्र वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होतात. तेव्हा पाहणाऱ्याची हसून-हसून अक्षरश: मुरुकुंडी वळते. 


अभिनेता अमेय वाघची या मालिकेतली भूमिका एका खोडकर मुलाची आहे. याविषयी तो अधिक सांगतो, 'बॉयगिरी मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अगदी खऱ्या आयुष्यातले काही जवळचे मित्र या मालिकेसाठी एकत्र आलेत. दर प्रोजेक्टमध्ये काही वेगळं करणं, ही तर बालाजीची खासियत... आणि 'ऑल्ट बालाजी'च्या सर्व मालिका हिट गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत करतील. बॉयगिरी मालिका ब्रोमॅन्सला अजून नव्या पातळीवर घेऊन जाईल. मी बज्जूच्या भूमिकेत तुम्हांला दिसेन. हा बज्जू आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेल्या सगळ्या जुगाडूंपेक्षा मोठा जुगाडू आहे. तुम्हांला गरज नसली तरीही तो दरवेळा मदतीला तत्पर असतो.