सिनेमा : ध्यानीमनी 


दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी 


लेखक : प्रशांत दळवी 


कलाकार : अश्विनी भावे, महेश मांजरेकर, अभिजित खांडकेकर, मृण्मयी देशपांडे


मुंबई : आज बिग स्र्किनवर महेश मांजरेकर निर्मीत आणि चंद्रकांत कुलकर्णा दिग्दर्शित 'ध्यानीमनी' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'ध्यानीमनी' याच नाटकावर आधारित 'ध्यानीमनी' हा सिनेमा आहे. सदानंद आणि शालिनी पाठक या दोघांची ही गोष्ट... या दोघांच्या लग्नाला अनेक वर्षी झालीत, तरी मूल नाही... मूल होत नसल्याच्या धक्क्यानं शालिनीचं मानसिक संतुलन बिघडतं. त्यामुळे आपल्याला मूल आहे, त्याचं नाव मोहित आहे, या अशा खोट्या दुनियेत ती रमू लागते. 


दुसरीकडे बायको शिवाय आपलं जगात कुणीच नाही या विचारानं सदानंदही तिच्या या खोट्या जगात सामील होतो. शालिनीचा हा आजार वाढत जातो, या काल्पनिक जगातून आता बाहेर पडणं तिला शक्य नाही. याच दरम्यान सिनेमात समीर आणि अपर्णाची एन्ट्री होते, जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि मृण्मई देशपांडेनं... समीरनं सायकॉलॉजीचा अभ्यास केलाय. शालिनीला मूल नसल्यानं, झालेला मानसिक आजार पाहता, समीर तिला या आजारातून बाहेर काढण्यात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ध्यानीमनी हा सिनेमा पहावा लागेल.


दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सिनेमाला उत्कृष्ठ ट्रिटमेन्ट दिलीय. त्यात सोने पे सुहागा म्हणजे प्रशांत दळवी यांची कथा, पटकथा आणि संवाद... या सगळ्या गोष्टी नीट जमून आल्यामुळे ध्यानीमनी हा सिनेमा तुम्हाला खिळवून ठेवतो. 


अभिनेता महेश मांजरेकरनं साकारलेला सदा उत्तम झालाय. सिनेमात त्यांना संवाद जरी कमी असले तरी त्यांचा परफॉर्मन्स कमाल झालाय. विशेष करुन सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये त्यांनी बाजी मारलीय. 
 
अभिनेत्री अश्विनी भावे अनेक वर्षांनी पुन्हा बिग स्क्रिनवर पहायला मिळतेय. सिनेमातली त्यांची व्यक्तिरेखा ही जरा लाऊड वाटते, पण कदाचित कॅरेक्टरची गरज असल्यामुळे ते करणं त्यांना भाग असावं. त्यांचा अभिनय छान झालाय. 


'ध्यानीमनी' हा एक रहस्यपट आहे, सिनेमाची पटकथा मजबूत असल्यामुळे, सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.ध्यानीमनी या सिनमातली एकच गोष्ट खटकते ती म्हणजे अऩेक दिवसांपासून सिनेमा रखडलेला असल्यामुळे, सिनेमाची टेक्निकल बाजू जरा कमजोर जाणवते. 


बाकी हा सिनेमा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे... यात ड्रामा आहे, सस्पेन्स आहे, कलाकारांचे उत्तम परफॉरमेन्स आहेत. त्यामुळे सिनेमा एकदातरी पहायला हरकत नाही... ध्यानीमनी या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला आम्ही देतोय 3.5 स्टार्स...