ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता कुलकर्णीची बँक खाती गोठवली
ड्रग्ज रॅकेटप्रकरणी आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची गुजरात आणि मुंबईतली जवळपास आठ बँकांची खाती गोठवण्यात आली आहेत.
मुंबई : ड्रग्ज रॅकेटप्रकरणी आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची गुजरात आणि मुंबईतली जवळपास आठ बँकांची खाती गोठवण्यात आली आहेत. या सगळ्या खात्यांमध्ये अंदाजे 90 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.
मालाडमध्ये एका बँकेत ममताचे 67 लाख रुपये आहेत, तर बाकीचे 26 लाख रुपये कल्याण, बदलापूर, ठाणे, परळ, नरीमन पॉईंट, धारावी, राजकोट आणि भुजमधल्या बँकांमध्ये आहेत.
ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ममता आणि तिचा सहकारी विक्की गोस्वामीवर आरोप आहेत. ममताला या प्रकरणात मुख्य आरोपीही बनवण्यात आलं आहे. 17 आरोपींपैकी 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर बाकीचे सात जण फरार आहेत.
ड्रग्ज रॅकेटप्रकरणी केनिया आणि दुबईत झालेल्या बैठकीत ममतानं महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा पोलिसांचा दावा आहे. यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये सोलापुरात पोलिसांनी छापा मारून 18.5 टन इफेड्रिन ड्रग्ज जप्त केलं होतं. याची किंमत दोन हजार कोटी रुपये होती.