मुंबई : ही कथा आहे देशपांडे कुटुंबियांची. दामोदर निवास या एका जुन्या वाड्यात एकत्र राहणारं हे कुटुंब. दामोदर देशपांडे यांच्या पश्चात या कुटुंबात चंद्रकांत आणि सुर्यकांत ही दोन मुले, मुलगी शैला आणि तिचा नवरा जयंता ही मंडळी एकत्र राहतात. यातील सुर्यकांत आणि विजूची मुलगी आहे नूपुर जिला सर्वजण लाडाने ‘नकटू’ अशी हाक मारतात. याच नकटूची आणि तिच्या लग्नाची ही गोष्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नूपुरचं लग्न या वाड्यातच व्हावं ही दामोदररावांची शेवटची इच्छा होती. या लग्नानंतरच हा जीर्ण झालेला वाडा पाडावा आणि त्याजागी इमारत उभी करावी अशी त्यांची एक प्रकारची अटच. त्यामुळे आता सर्वांना घाई आहे ती नूपुरच्या लग्नाची. यासाठी त्यांच्या नजरेत एक मुलगा सुद्धा आहे तोही याच घरातला तो म्हणजे नूपुरची आत्या शैलाचा मुलगा नीरज. परदेशात असलेला नीरज घरातील एका समारंभानिमित्ताने भारतात येतोय आणि याचवेळी लग्नाची बोलणी करण्याचा निर्णय कुटुंबातील सदस्य घेतात. नीरज परत येतो आणि त्याला ही लग्नाची लगबग लक्षात येते आणि तो या लग्नासाठी नकार देतो. 


खरं तर आजवर नीरजचीच स्वप्ने बघणारी नूपुर त्याच्या या निर्णयाने दुःखी होते त्यामुळे तिच्यासाठी मुलगा शोधण्याची जबाबदारी नीरज स्वतःवर घेतो आणि घरात सुरु होतो कांद्यापोह्याच्या तयारीचा आगळा वेगळा समारोह. नूपुरसाठीचं वरसंशोधन हाच या मालिकेचा मुख्य गाभा!! आता नकटीसाठी कोणकोणती स्थळे येतात तोच या मालिकेचा महत्त्वाचा आणि गंमतीचा भाग असणार आहे.


नकटीला बघायला येणार सेलिब्रिटी


हलक्याफुलक्या ढंगाने रंगणा-या या गोष्टीत धम्माल आणणार आहेत ते नकटीला बघायला येणारी वर मंडळी. दर आठवड्याला या मालिकेत सेलिब्रिटी वरमंडळीची हजेरी लागणार आहे ज्यामध्ये अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, शशांक केतकर, अवधूत गुप्ते आणि इतर बरेच लोकप्रिय कलाकार बघायला मिळणार आहेत. या सर्वांच्या व्यक्तिरेखाही तेवढ्याच धम्माल पद्धतीने लिहिण्यात आल्या आहेत. याचं आदरातिथ्य करतांना देशपांडे कुटुंबांची उडणारी तारांबळ, प्रत्येक मुलगा कसा योग्य आहे नूपुरला पटवून देताना त्यांच्या नाकी नऊ येणार आणि काही ना काही कारण देत नूपुर त्या मुलाला नकारही देणार.


या मालिकेत नूपुरच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. याशिवाय मालिकेत संजय सुगावकर, पौर्णिमा तळवलकर, आसित रेडीज, वर्षा दांदळे, शकुंतला नरे, रागिनी सामंत, सोनाली पंडित, आनंदा कारेकर, अभिनय सावंत, अभिजीत आरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे गौतम कोळी यांनी. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांची पटकथा तर प्रल्हाद कुडतरकर यांचे संवाद आहेत.