औरंगाबाद : बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. पण सध्या राम गोपाल वर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. रामगोपाल वर्मा विरोधात औरंगाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.


रामगोपाल वर्मा यांनी 2009 मध्ये दिग्दर्शित केलेल्या 'अज्ञात' या चित्रपटामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यांच्यावर या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 'अज्ञात' चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधातही न्यायालयाने अटक वारंट काढले आहे.


औरंगाबादमधील मुस्ताक मोहसिन नावाच्या एका व्यक्तीने 2009 मध्ये आलेल्या अज्ञात सिनेमाची मूळ कथा त्याची असल्याचा दावा केला होता. वर्मा यांनी या सिनेमात नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना कथेचे श्रेय दिले होते. 


तर 'मी ही कथा राम गोपालला पाठवली होती... नंतर त्यांचं काहीच उत्तर आले नाही. पण काही दिवसांनी अज्ञात सिनेमा पाहिला तेव्हा तो संपूर्ण सिनेमा हा माझ्याच कथेवर असल्याचे मला समजले. त्यामुळेच मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे' असे मोहसिनने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने दोघांनाही समन्स पाठवले आहेत.