`कबाली` पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!
गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.
मुंबई : मुंबईतल्या एका थिएटरमधलं चित्र बोलकं होतं... 'कबाली' पाहताना थिएटरमध्येच रजनीच्या फॅन्सनी ५०० रुपयांच्या नोटा उडवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय.
थिएटरबाहेर रांगा, दुग्धाभिषेक आणि बरंच काही
गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.
जिथे - तिथे सुपरस्टार रजनीकांतचा जलवा पहायला मिळतोय. एखादी फिल्म पाहण्यासाठी थिएटरसमोर पहाटे चार वाजल्यापासून रांगा लागल्याचं चित्र भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात खूप कमी कलाकारांच्या नशिबी आलंय. एकीकडे थिएटरवर प्रेक्षक कसा आणायचा या चिंतेनं अनेक कलाकार, निर्मात्यांना झोप येत नाही. तर दुसरीकडे अगदी पहाटे सहा वाजता फस्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांची उडालेली झुंबड, पहाटे चार वाजल्यापासून लागलेल्या रांगा, रॅली आणि आपल्या लाडक्या सुपरस्टारला दुग्धाभिषेकही... ही कमाल आहे फक्त आणि फक्त रजनीकांत या नावाची. रजनीकांतचा कबाली भारतासह जगभरातील थिएटर्समध्ये दाखल झालाय. ३० हून अधिक देशांमध्ये तब्बल १२ हजारहून अधिक स्क्रीन्सवर कबाली झळकतोय. रजनीचा कबाली येतोय म्हटल्यावर त्याचं स्वागतही त्यांचे फॅऩ्स त्यांच्याच हटके स्टाईलमध्ये करतायेत. त्यामुळे लुंगी डान्सची धमालही थिएटरबाहेर पहायला मिळतेय.
प्रेक्षकांच्या सुट्टीचा दिवस...
सुपरस्टार रजनीचा जलवा हा असा आहे. प्रेक्षक आपल्या या लाडक्या सुपरस्टारला जणू देवच मानतात. बॉलिवूड, टॉलिवूडची बॉक्स ऑफिसवरची सगळी गणितं बदलणाऱ्या रजनीचा जलवा म्हणूनच वेगळा ठरतो. अगदी बिग बी अमिताभ बच्चनपासून ते खान मंडळींपर्यंत अनेक बडे स्टार्स रजनीचे फॅन आहेत. रजनीचा जलवा एवढा आहे की अनेक व्हॉट्सअप मेसेजेसही मोबाईलवर फिरू लागलेत. उदाहरणच द्यायचं झालं तर तीनही खान शक्यतो सुटीचा दिवस पाहून आपली फिल्म रिलीज करतात, मात्र रजनीकांतची फिल्म ज्या दिवशी रिलीज होते, तोच प्रेक्षकांसाठी सुटीचा दिवस बनतो. हेच चित्र कबालीच्या निमित्तानेही पहायला मिळालं. बंगळुरूमध्ये अनेक कार्पोरेट कंपन्यांनी कबाली प्रदर्शित होतोय म्हणून कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केलीय. एवढंच नाही तर मुंबईत ज्या अरोरा थिएटरमध्ये कबाली रिलीज झाला तिथे डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आणि हेल्थ चेकअप कॅम्पही आयोजित केले.
रजनीची ही क्रेझ एवढी कशी याची उत्सुकता स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मंगेश देसाई यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनाही म्हणूनच चकीत करते.
दोन मराठमोळे कलाकार
कबालीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुपरस्टार रजनी म्हणजेच मराठमोळा शिवाजीराव गायकवाडसोबत राधिका आपटे असं मराठमोळं कॉम्बिनेशन कबालीमध्ये पहायला मिळतंय. त्यामुळे राधिकाची केमेस्ट्री कशी रंगलीय, याची उत्सुकता प्रत्येकालाच असणार. कबालीचं रविवारपर्यंत हाऊसफुल्ल बुकिंग आहे. एकूणच फॅन्सचा हा जबरदस्त रिस्पॉन्स पाहता रिलीजनंतर कबाली किती रेकॉर्डब्रेक कमाई करतो याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्यात.