`सैराट`चा विक्रम, मराठीतील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट
सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे.
मुंबई : सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे.
दोन आठवड्यात किती कमाविले
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच झिंग चढली आहे. अजय-अतुलच्या संगिताने सजलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एका आठवड्यात आतापर्यंत तब्बल ४१ कोटींची कमाई केली आहे.
नटसम्राटला टाकलं मागे
यापूर्वी एका आठवड्यात नटसम्राटने १५ कोटी रुपये कमाई केल्याचा विक्रम होता. पण तो विक्रम सैराटने न केवळ तोडला. पण आणखी १० कोटी २५ लाखांची बक्कळ कमाई करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ११ दिवसात एकूण ४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत नटसम्राटाने सर्वाधिक ४० कोटींची कमाई केली आहे. त्याला सैराटने दुसऱ्याच आठवड्यात मागे टाकले आहे.
५० कोटी आकडा गाठणार
सैराट नावाचं वादळ ज्या प्रकारे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर घोंगावत आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात ५० कोटी रुपयांचा आकडा सैराट पार करेल अशी शक्यता सिने विश्लेषकांनी व्यक्त केली होती. ती पुढील आठवड्यात खरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कशी झाली कमाई
सैराटने पहिल्या तीन दिवसांत सुमारे १२ कोटी १० लाखांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केलाय. पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रभर सुमारे ४०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा झळकला. एकूण ८५०० शो आठवड्यात झाले. त्यातून २५ कोटीचा विक्रमी गल्ला कमाविला आहे. दुसऱ्या आठवड्यात थिएटर आणि शोची संख्या वाढली. त्यामुळे एकूण ११ दिवसात ४१ कोटी कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित केला.