मुंबई : मराठी सिनेक्षेत्रात 'सैराट' सिनेमाला 'न भूतो न भविष्यती' असे यश मिळतेय. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही सिनेमाला इतकी बक्कळ कमाई करता आली नव्हती तितकी सैराटने केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२९ एप्रिलला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून हा चित्रपट राज्य आणि राज्याबाहेरील थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने ६० कोटीहून अधिक कमाईचा आकडा पार केलाय.


चित्रपटाच्या या जबरदस्त यशानंतर मुख्य भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांना प्रत्येकी ५ कोटी रुपये बोनस म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रपट निर्मात्यांनी केल्याचे वृत्त मुंबई मिररमध्ये प्रकाशित झाले आहे. दरम्यान, या वृत्तानंतर सोशल मीडियावर चर्चांना मोठा ऊत आलाय. ही बातमी खोटी असल्याचे झी स्टुडिओच्या सूत्रांनी सांगितले आहे.  


यापूर्वी किती ठरले होते मानधन


चित्रपटासाठी यापूर्वी रिकू आणि आकाशला प्रत्येकी चार लाख रुपयांसाठी साईन करण्यात आले होते. मात्र सैराटला मिळालेले जबरदस्त यश पाहता त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पण ते पूर्णपणे खोटे असल्याचे झी स्टुडिओच्या सूत्रांनी सांगितले आहे. 


 


किती होते चित्रपटाचे बजेट


सैराट चित्रपटाचे बजेट ४ कोटी रुपयांपर्यंत होते. मात्र या चित्रपटाने बजेट तर पार केलेच मात्र त्याहूनही कित्येक पटींनी अधिक कमाई केलीय. अजूनही सैराटचे अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल आहेत. 


अजय-अतुल यांचे अप्रतिम संगीत


सैराट चित्रपटातील सर्वच गाणी हिट झालीत. अजय-अतुल यांनी चारही गाणी लिहीली असून ती संगीतबद्ध केलीत. यातील याड लागलं हे गाणं लॉस एंजेलिसच्या सोनी थिएटरमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं होतं. यासाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च झाला होता.