`सैराट`च्या संगीताचं रेकॉर्डिंग हॉलिवूडमध्ये
मुंबई : गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट सृष्टीने देशभरात आपला ठसा उमटवला आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट सृष्टीने देशभरात आपला ठसा उमटवला आहे. आगामी येऊ घातलेल्या 'सैराट'ने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडत भारतीय चित्रपट सृष्टीत एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील हॉलिवूडमध्ये संगीताचं रेकॉर्डिंग करणारा 'सैराट' हा पहिला भारतीय चित्रपट ठरलाय. अजय - अतुल या लोकप्रिय जोडगोळीने हॉलिवूडमधील सोनी स्कोअरिंग स्टुडिओ येथे या चित्रपटाच्या संगीताचं रेकॉर्डिंग केलंय.
'आम्हाला या चित्रपटासाठी एका विशिष्ट प्रकारच्या संगीताची गरज होती. नागराज मंजुळेचा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एका विशिष्ट दर्जाचा असतो. ते अशाप्रकारे चित्रपट बनवतात की त्याचा विषय आणि त्या विषयाची ज्याप्रकारे हाताळणी केलेली असते ते सिनेमागृह सोडल्यानंतरही लोकांच्या लक्षात राहतं. आमचं संगीत उठून तर दिसायला हवं होतं, पण चित्रपटाच्या विषयापेक्षा ते अवजड होऊन चालणारं नव्हतं. आता मात्र लोकांना आमचं संगीत आवडल्याच्या प्रतिक्रिया येतायंत ते ऐकून बरं वाटतंय,' असं अजयने डीएनए वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
या स्टुडिओत त्यांनी ४५ जणांच्या वाद्यवृंदासोबत या चित्रपटाच्या संगीताचं रेकॉर्डिंग केलंय. सेलो, व्हायोलिन, हार्प, हॉर्न, ब्रास अशा विविध वाद्यांवर त्यांनी विशेष लक्ष दिलंय. या स्टूडिओमध्ये याआधी गॉन विथ द विंड, बेन हर, लॉरेन्स ऑफ अरेबिया यांसारख्या प्रथितयश चित्रपटांच्या संगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय. हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग हे नेहमीच या स्टूडिओत त्यांच्या चित्रपटाच्या संगीताचं रेकॉर्डिंग करतात.
'झी स्टूडिओ'ची निर्मिती असलेला 'सैराट' २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळेच्या 'फँड्री'नंतर आता सैराटकडून नागराजच्या चाहत्यांना अपेक्षा आहेत.