मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय मानाचा समजला जाणारा, चित्रपटसृष्टीसह अवघ्या रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला. आपल्या हळव्या प्रेमकथेने आणि झिंगाट गाण्यांनी सर्वांनाच वेड लावणा-या सैराट चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांसहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं. डोळे दिपवून टाकणारा रंगमंच, त्यावर सादर होणारे रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांमधून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याचं आकर्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार. आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आणि त्यांचा सन्मान करणाऱ्या झी चित्र गौरव पुरस्काराची प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतील सर्वच मंडळी आतुरतेने वाट बघत असतात. या सोहळ्यात कोण बाजी मारतो याकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या पुरस्काराबाबतीतही ही उत्सुकता कायमच होती. मराठी रसिकांची मने जिंकलेले चित्रपट आता कोणता पुरस्कार जिंकतात याबद्दलची उत्कंठा उपस्थितांमधे होती. यंदा हाफ तिकीट, कासव, नदी वाहते, उबुंटू, वाय झेड, जाऊंद्याना बाळासाहेब, सैराट यांसह अनेक चित्रपटांना विविध विभागांत नामांकने मिळाली होती. यामध्ये सैराटने सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकाविले. याशिवाय इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार अभिनेता आकाश ठोसरने तर गार्नियर ब्लॅक नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इयर हा पुरस्कार अभिनेत्री रिंकु राजगुरुने मिळविला.


यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारांमध्ये आकाश ठोसर (सैराट), गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब) आणि मकरंद अनासपुरे(रंगा पतंगा) यांच्यामध्ये चुरस रंगली आणि यात बाजी मारली ती गिरीश कुलकर्णी यांनी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी रिंकू राजगुरु (सैराट), पर्ण पेठे (फोटोकॉपी) आणि इरावती हर्षे (कासव) यांच्यामध्ये बाजी मारली ती इरावती हर्षेने.