मुंबई : लाल इश्क चित्रपटातून बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलंय. मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या निर्मात्याचे मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांवर बॉलीवूडइतकेच प्रेम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले भन्साळी?


माझा जन्म मुंबईतला. महाराष्ट्रातच वाढलो त्यामुळे मराठीवर माझे प्रेम आहे. इथल्या मातीशी मी एकरूप झालोय. मराठी खाण हा जसा माझा विक पॉइंट तस मराठी गाणी,मराठी चित्रपट हे देखील तितकेच आवडीचे विषय. म्हणूनच मराठी इतिहासावर आधारित बाजीराव मस्तानी हा चित्रपट मी काढला.


त्यानंतर लाल इश्क हा चित्रपट मी मराठीत काढला आणि त्याचा मला अभिमान आहे, असे लाल इश्क चे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत सांगितले.


स्वप्ना वाघमारे जोशी दिगदर्शित आणि संजय लीला भन्साळी निर्मित लाल इश्क हा चित्रपट काल संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.


संजय लीला भन्साळी यांनी पुढे सांगितले की, पूर्वी दर रविवारी दूरदर्शनवर मराठी चित्रपट पहायचो आणि त्यातून मराठीवर माझे प्रेम अधिक वाढू लागले. सुलोचना दीदी, जयश्री गडकर, अरूण सरनाईक हे अभिनेते मला फार आवडायचे. मला मराठी संस्कृतीशी एकरूप झाल्यासारखे वाटते.


याचबरोबर मराठी प्रेक्षकवर्ग मला फार आवडतो. ते वेगवेगळ्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद देतात. हिंदी सिनेमांसारखा एकच साचा मराठीत नाही.


येत्या काळात मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणार


मला मराठी आवडते आणि बोलताही येते त्यामुळे नजीकच्या काळात मी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करायला मला नक्की आवडेल. परंतु त्याआधी आणखी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे भन्साळींनी सांगितले.