सोहेल खाननं महिला पत्रकारांना दिल्या शिव्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट सुलतानपेक्षा त्याच्या लग्नाबाबतचीच चर्चा सुरु आहे.
मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट सुलतानपेक्षा त्याच्या लग्नाबाबतचीच चर्चा सुरु आहे. सलमान या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करेल, असंही बोललं जात आहे.
सलमान खान आणि लुलीया प्रीती झिंटाच्या लग्नाला एकत्र पोहोचल्यानं या चर्चांना आणखी उधाण आलं. सलमानच्या लग्नाबाबत त्याच्या कुटुंबालाही विचारण्यात आलं. सलमानचा भाऊ अरबाज खाननं या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
पण सलमानच्या लग्नाबाबत सोहेल खानला विचारल्यावर मात्र तो चांगलाच भडकला. हा प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराला सोहेलनं शिव्या दिल्या.
सोहेल आणि त्याचे वडिल सलीम खान एका क्लबमधून जेऊन बाहेर पडत होते, तेव्हा काही पत्रकारांनी या दोघांना गाठलं आणि सलमानच्या लग्नाविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा सोहेल भडकला.
सलमाननंही घेतली सोहेलची बाजू
सोहेलच्या या वागण्यानंतर सलमाननं सोहेलची बाजू घेतली आणि मीडियालाच दोषी ठरवलं आहे. रात्री १२ वाजता त्याला माझ्या लग्नाबाबत विचारायची काय गरज होती, असा सवाल सलमाननं पत्रकारांना विचारला आहे.
कोणत्याही सेलिब्रिटीजचा बाईट घेण्यासाठी त्यांच्या तोंडामध्ये माईक घालणं चुकीचं आहे. यामुळे कोणालाही राग येऊ शकतो, असंही सलमान म्हणाला आहे.