मुंबई : पहिल्यांदाच बॉलिवूडच्या एका व्यक्तीनं दबंग सलमान खानशी उघड उघड पंगा घेतलाय. बॉलिवूड गायिका सोना महापात्रा हिनं सलमान खानची 'बलात्कारा'वर केलेल्या कमेंटवर जोरदार टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानवर केलेल्या टीकेमुळे सलमानच्या फॅन्सनं सोशल मीडियावर सोना महापात्राला चांगलंच ट्रोल केलं होतं. यामुळे वैतागलेल्या सोनानं पुन्हा एकदा आपलं म्हणणं सोशल मीडियावरच मांडलं. 


नेमकं काय म्हटलंय सोनानं फेसबुकवर


बिहारच्या मोतिहारीमध्ये एका २१ वर्षांच्या मुलीवर गँगरेप केला गेला. बंदुक आणि लाकडांचे तुकडे तिच्या शरीरात घुसवले गेले आणि तिला गंभीर परिस्थितीत सोडून देण्यात आलं. हे खूपच दुख:द आहे की आरोप अद्याप फरार आहे. यामध्ये नवं काय आहे? याच दरम्यान छत्तीसगडची सोनी सुरी गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलीय. हे उपोषण त्या महिलेसाठी आहे जी काही लोकांच्या अमानुषतेला बळी पडली आणि मृत्यू पावली. या विषयावर टीव्हीमध्ये कोणतीही चर्चा झालेली दिसत नाही. कदाचित यात कोणतंही ग्लॅमर नसेल. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वेळेस मला अशा चर्चेचा भाग बनावं लागतंय. मी एक मोठा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला.. केवळ एक कमेंट केली नव्हती. त्या मुद्द्याला ऐकणारं मात्र कुणीही नाहीय. यामुळेच मी सगळ्यांना दुर्लक्ष करतेय, असं सोनानं म्हटलंय. 


हे खरं आहे की गेल्या ४८ तासांमध्ये मला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. आत्तापर्यंत मला १००० हून जास्त बलात्काराच्या धमक्या मिळाल्यात. अनेकांनी पॉर्नसारखे अनेक न्यूड फोटो पाठवलेत... मला काम मिळणार नाही... आणि असं खूप काही' असंही सोनानं फेसबुकवर म्हटलंय. 


'सलमान काम हिरावून घेऊ शकणार नाही'


यानंतर मात्र सोनानं सलमानला निशाण्यावर घेतलंय. हे सगळं आपल्या समाजात पसरत चाललेल्या विषाकडे इशारा करतंय. ते विष तेव्हा वाहतं जेव्हा दर्शक आणि फॅन्सची गर्दी एका व्यक्तीला 'नॅशनल आयकॉन' बनवून टाकते. आणि हे कथित 'नॅशनल आयकॉन' अनेकदा 'गैरवर्तन' करतात. या कामांसाठी त्यांना शिक्षा मिळणं तर दूरच पण त्यांना आणखी बढावा मिळतो. कहर म्हणजे, त्यांना 'गुडविल'चा अॅम्बेसेडर बनवलं जातं. असं म्हणताना मी खूप निराश आहे. पण मी हार मानणार नाही. मी आयुष्यभर हेच शिकलेय. 


मी काही मूर्ख आणि धोकादायक लोकांना स्वत:वर विजय मिळवू देऊ शकत नाही. कोण माझ्याकडून माझं काम हिरावून घेणार??? सलमान खान??? तो 'टॅलेंटेड (?) ठग'? मला माहित आहे की माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत गाणार... तो किंवा आणखी कुणीही मला काम करण्यापासून रोखू शकणार नाही.