मुंबई : सण समारंभ म्हटलं घरामध्ये रेलचेल असते ती विविध पाककृती बनविण्याची. गोडधोड पदार्थ, चमचमीत रेसिपीज्, खमंग, खुसखुशीत पदार्थ बनविण्याची लगबग घराघरांत बघायला मिळते. यातही प्रत्येक सणाला काही तरी वेगळं आणि खास बनविण्याची इच्छा घरातील सुगरणींना असते. पण हे वेगळं काय यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या सुगरणींच्या मदतीला येणार आहे झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधील सासू सुनांच्या जोड्या तेही ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या माध्यमातून. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये सासू सुनेचा धमाल स्वयंपाक सोहळा रंगणार आहे. येत्या २८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दुपारी १.३० वा. झी मराठीवरुन हे विशेष भाग प्रसारीत होणार आहेत.


माझ्या नवयाची बायको मालिकेतील राधिका आणि सासूबाईंच्या नात्यातला गोडवा आता खवय्येमध्येही बघायला मिळणार आहे. यात सासू (भारती पाटील)हिरव्या वाटाण्याची पुरणपोळी बनविणार असून राधिका (अनिता दाते) रताळ्याची सुतार फेणीची खास रेसिपी दाखवणार आहे.


काहे दिया परदेसमध्ये सध्या गौरी आपल्या माहेरी आली आहे. कुटुंबात निर्माण झालेले गैरसमज, अम्माजीने रचलेली खेळी यामुळे शीव आणि गौरीच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे. परंतु आता अम्माजींची नाराजी दूर करण्यासाठी संकर्षण दादा गौरीच्या मदतीला येणार आहे. खवय्येच्या किचनमध्ये या दोन्ही सासू सुना एकत्र येत टमाटर आलू चाट आणि कच्च्या पपईचा हलवा या पाककृती बनविणार आहेत. 


‘चुकभूल द्यावी घ्यावी’ मधील नानी म्हणजे जणू कडकलक्ष्मीच. नानींपुढे याही वयात ना राजाभाऊंचं काही चालतं ना मालतीचं. असं असलं तरीही नानी सर्वांवर प्रेमही तेवढंच करते आणि घरातील सर्वजण नानींचा शब्दही आज्ञेप्रमाणे पाळतात. या दोघी सासू सुनांची जुगलबंदी खवय्येच्या किचनमध्ये बघायला मिळणार आहे. यात नानी (नयना आपटे) काकडीची खीर बनविणार आहेत तर मालती (सुकन्या मोने) केळ्याची भाजी बनविणार आहेत.


‘खुलता कळी खुलेना’मध्ये मोनिकाच्या कारस्थानामुळे सध्या दळवी कुटुंबिय त्रस्त झाले आहेत. आपल्या सुनेच्या या सगळ्या प्रकारांमुळे अलकाबाईसुद्धा चिंताग्रस्त झाल्या आहेत. असे असले तरी खवय्येच्या मंचावर मात्र या दोघी एकत्र येऊन छान डिशेस सादर करणार आहेत. या भागात मोनिका (अभिज्ञा भावे) भोपळ्याची बर्फी बनविणार आहेत तर अलका (सविता प्रभुणे) गुलकंद कचोरी ही रेसिपी बनविणार आहेत.