औरंगाबाद : आधी दुष्काळ... मग पाऊस... मग पूर आणि आता घोषणांचा महापूर... हे चित्र आहे मराठवाड्यातलं. तब्बल 8 वर्षांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची बरसात करण्यात आलीय... त्याच वेळी विविध मागण्यांसाठी निघालेल्या अनेक लहानमोठ्या मोर्चांचाही शहरात दणका उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेले काही दिवस आकाशातल्या पावसाचा मारा सोसणाऱ्या मराठवाड्यानं घोषणांचा पाऊस अनुभवला... निमित्त होतं औरंगाबादमध्ये दीर्घ प्रतिक्षेनंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचं... पावसाच्या थैमानामुळं खरिपाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करताच भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय.


या बैठकीत मराठवाड्यासाठी इतरही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या...


- पुढील चार वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 9271 कोटी रूपये जाहीर करण्यात आले आहेत. तर मायक्रो इरिगेशनसाठी वेगळा निधी देण्यात येणार आहे. रस्त्यांसाठी 30 हजार कोटींची घोषणा करण्यात आलीय


- पंतप्रधान आवास योजनाद्वारे मराठवाड्यात 1 लाख तर राज्य शासनाच्या योजनांमधून 20 हजार घर उभ्यारण्यात येणार आहेत


- जालना येथे सीड पार्कसाठी 109 कोटींचा निधीची घोषणा करण्यात आली आहे.  जालना, लातूरच्या तंत्र निकेतन महाविद्यालयाचं रुपांतर अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार


- जालन्यात सिरसवाडी येथे इंस्टिट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नोलॉजी उभारण्यात येणार आहे.  परभणी, बीड आणि नांदेडमध्ये टेक्सटाइल पार्क उभरणार


- 25 हजार हेक्टर फळबागा लागवडीचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून यासाठीचं सरकारी अनुदान दुप्पट करण्यात येणार आहे.


- 2019 पर्यंत बीड-परळी रेल्वे पूर्ण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय


तर राज्य सरकारनं औरंगाबादवर विशेष मर्जी दाखवली आहे. 


- विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण करणार


- औरंगाबादमध्ये जल संधारण आयुक्तालय उभारणार 


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांतर्गत गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्था स्थापन करणार. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय आणि एक प्रशासकीय भवनासाठी 40 कोटींची तरतूद


- औरंगाबाद कॅन्सर इंस्टिट्यूटला स्टेट कैंसर इंस्टिट्यूटचा दर्जा देणार


- औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी 1 हजार कोटी देणार


- औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन, खुलताबादचा पर्यटन आराखडा जाहीर, 453 कोटींची तरतूद


- औरंगाबादेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याची घोषणा


एकीकडे हा घोषणांचा पाऊस पाडला जात असतानाच विविध मोर्चांनी शहर दणाणून गेलं. काँग्रेसनं मोर्चा काढून गेल्या वर्षीच्या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या मंत्रिमंडळ बैठकीची खिल्ली उडवली. 


याखेरीज धनगर समाज, शिक्षकांनीही मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चे नेले. या सर्व घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी मराठवाड्याच्या झोळीत 49248 कोटींची निधी देण्यात आलाय... 2009च्या तुलतेन हा निधी दुप्पट आहे. आता हा निधी खरोखरच शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार का हा खरा सवाल आहे. नाहीतर मराठवाड्यातल्या पावसासारखाच हा केवळ घोषणांचा पाऊस ठरू नये एवढीच अपेक्षा.