५००, १००० च्या नोटा रद्द झाल्या... वऱ्हाडींची उडाली `लगीनघाई`
ही गोष्ट ठाण्यातल्या एका लग्नाची... इतर लग्न घरांत जसा लगबग असते तशीच या घरातही आहे... पण या घरात लगबग आहेत बँकेत जाण्याची... कुणा-कुणाच्या नावावर पैसे काढायचे याचा हिशेब लावला जातोय.
ठाणे : ही गोष्ट ठाण्यातल्या एका लग्नाची... इतर लग्न घरांत जसा लगबग असते तशीच या घरातही आहे... पण या घरात लगबग आहेत बँकेत जाण्याची... कुणा-कुणाच्या नावावर पैसे काढायचे याचा हिशेब लावला जातोय.
अंकुश साबळेचं शनिवारी पुण्याला लग्न आहे. पण साबळे कुटुंबीय लग्नाची तयारी सोडून बँकेबाहेर उभे राहतायत. सुटवाल्याकडून उधारीवर ड्रेस आणल्याचं अंकुशचे वडील दशरथ साबळे सांगतात. दोन कार आणि १६ इनोव्हाच्या ड्रायव्हरचे पैसे द्यायचेत... मंडपवाला, डेकोरेशनावाला, हॉल, जेवणावळी, पुजेचं सामान... साऱ्यांचेच पैसे द्यायचे आहेत. अर्धे टोकन दिले असले तरी या सर्वांनाच आपल्यावर विनवणी करण्याची वेळ आल्याचं साबळे कुटुंबाचं म्हणण आहे.
उद्यावर लग्न आणि हातात पैसेच नाहीत अशी त्यांची अवस्था झालीय. लग्न कार्याला वेळ देणं सोडून असा वेळ वाया जात असल्याची खंत दिपा साबळे या वराच्या आईनं व्यक्त केलीय.
चेक पेमंटचा पर्याय काहींना मान्य आहे. पण ज्यांचे शे-पाचशे किंवा पाच सहा हजार रुपये द्यायचे आहेत त्यांना चेक कसा देणार... वरात निघाल्यावर नाश्ता चहा-पाणी यासाठी पैसे कुठून आणणार...
साराच सावळा गोंधळ... पण तरीही साबळे कुटुंबानंही मोदींच्या या निर्णयाचं स्वागतच केलंय, हे विशेष....