वृद्धांसाठी उभा राहिलाय `आधारमाये`चा वड!
फावल्या वेळात अनेक जण समाजसेवा करतात... पण डॉक्टरकीच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिनं एक निर्णय घेतला... आणि त्यामधूनच उभी राहिली डॉ. अपर्णा देशमुखांची `आभाळमाया`!
अश्विनी पवार, पुणे : फावल्या वेळात अनेक जण समाजसेवा करतात... पण डॉक्टरकीच्या करिअरच्या सुरुवातीलाच तिनं एक निर्णय घेतला... आणि त्यामधूनच उभी राहिली डॉ. अपर्णा देशमुखांची 'आभाळमाया'!
ज्या वयात करिअरची स्वप्न पूर्ण करायची त्या वयात तिनं फक्त करियरच नाही तर संपूर्ण आयुष्य वृध्दांच्या सेवेमध्ये वाहून घेतलं... अवघ्या सत्ताविसाच्या वर्षी तिनं घेतलेला हा निर्णय जितका ठाम होता, त्याहीपेक्षा जास्त कठीण होतं त्या निर्णयावर टिकून राहणं.
मात्र, ही गोष्ट सत्यात उतरवली ती पुण्यातल्या डॉक्टर अपर्णा देशमुख यांनी... मूळच्या जळगावच्या असणाऱ्या अपर्णानं पुण्यातून मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं...
मेडिकलचं शिक्षण घेत असताना वृद्धाश्रमातल्या वृद्धांच्या व्यथा अत्यंत जवळून पाहिल्या आणि त्यातूनच वृद्धाश्रम सुरु करण्याचा निर्णय तिनं घेतला आणि त्यातूनच 'आभाळमाया' वृद्धाश्रमाची स्थापना झाली.
आभाळमायामध्ये वृद्धांच्या देखभालीसाठी अगदी नाममात्र फी आकारली जाते. अनेक वृद्धांचे नातेवाईक त्यांना इथे सोडून गेल्यानं त्यांचा राहण्याचा खर्चही वृद्धाश्रमाकडूनच केला जातो.
खर्च आणि आणि उपचार याहीपेक्षा पुढे जाऊन आभाळमायामध्ये वृद्धांवर मायेची पाखरण केली जाते आणि त्यामुळे इथे येणारे सगळेच आभाळमाया कुटुंबातला भाग होऊन जातात.
आजच्या स्पर्धेच्या युगात तरुण शिक्षणानंतर नोकरी आर्थिक स्थैर्य यामध्ये अडकतो. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी वृध्दांचा आधारवड होणाऱ्या अपर्णानं समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय.