अभिनेता सागर चौगुलेंचा रंगमंचावरच मृत्यू
पुण्यात नाटकाचा प्रयोग सादर करताना रंगमंचावर हृद्यविकाराचा झटका येऊन कोल्हापूरातील अभिनेता सागर चौगुले यांचा मृत्यू झाला आहे.
पुणे : पुण्यात नाटकाचा प्रयोग सादर करताना रंगमंचावर हृद्यविकाराचा झटका येऊन कोल्हापूरातील अभिनेता सागर चौगुले यांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रयोग सुरू असतानाच हा प्रकार घडला.
कोल्हापूर केंद्रातून हृदयस्पर्श हौशी नाट्य संस्थेच्या अग्निदिव्य या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. प्राथमिक फेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी सागर चौगुले यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळालं. अंतिम फेरीत बाजी मारायचीच या निर्धाराने ही टीम कसून तयारी करीत होती.
पुण्यात काल ८ वाजण्याच्या सुमारास प्रयोग सुरु झाला. सागर चौगुले हे शाहू महाराजांच्या भूमिका बजावत होते. त्यांच्या एन्ट्रीलाच प्रेक्षकांना भरभरुन दाद दिली, मात्र थोड्याच वेळात सागर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते रंगमंचावर कोसळले. रंगमंचावरच सागर कोसळल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं.