परभणी :   परभणीत आणखी एक इसीस समर्थकाला अटक करण्यात आली आहे. एटीएसने आणखी एका तरुणास इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. हा तरूण २८ वर्षांचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एटीएस'चे पथक आज शहरात दाखल झाले आणि गुलजार कॉलनीतील मदीनापाटीजवळील पथकाने इकबाल याचे घर गाठले. घराची तपासणी करून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. 


शहरातील गुलजार कॉलनीतील मदीनापाटीजवळ आज सकाळी ही कारवाई केली. इकबाल अहेमद कबीर अहेमद असे संशयित तरुणाचे नाव आहे. 'एटीएस'ने ताब्यात घेतलेल्यांची संख्या आता ३ झाली आहे. 


हैदराबाद शहरात १३ जुलैला चौघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर परभणीचे कनेक्‍शन पुढे आले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ जुलैला नासेरबीन याफाई चाऊस याला "एटीएस‘ने ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार शाहीदखान मुन्वर खान याला २४ जुलैला अटक करण्यात आली. नासेरबीन याने बॉंब तयार केला होता. या बॉंबसह काही स्फोटके शाहीदखानच्या घरातून ताब्यात घेण्यात आली. 


औरंगाबाद ग्रामीण आणि नांदेड येथील पोलिस मुख्यालय स्फोटाद्वारे उडवून देण्याचा कटही दोघांनी आखला होता. रमजानऐवजी गणेशोत्सवात हा स्फोट घडविण्याचा त्यांचा इरादा होता. शिवाय या दोघांकडे आणखी काही स्फोटके असल्याचा संशय आहे. 


या दोघांकडून मिळणाऱ्या माहितीच्या पार्श्‍वभूमीवर 'एटीएस'ने पुढचे पाऊल टाकत इकबालला ताब्यात घेतले. तत्पूर्वी जिल्हा पोलिसांना दोन दिवसांपूर्वी बॉंबस्फोटाबाबत धमकीचे निनावी पत्र मिळाले होते. त्यामुळे शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.