विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद :  इंजिनिअरिंगचे पेपर घरी सोडवणा-या 27 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलीय... इंजिनिअर होण्याची स्वप्न पाहणा-या या मुलांना आता तोंड लपवण्याची वेळ आलीय. कारण त्यांनी प्रतापही तसाच केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्व विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या क्राईम ब्रांचनं अटक केलीय. हे विद्यार्थी शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी पेपर सोडवताना रंगेहाथ पकडल्या गेलेत. 


औरंगाबादच्या चौका इथल्या साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजच्या या विद्यार्थ्यांचा मंगळवारी बीई सिव्हील सेकंड ईयरचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉईंग हा पेपर होता. काही ठराविक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेचं फक्त पहिलं पान लिहलं आणि उत्तरपत्रिका जमा केली. 


 



रात्री कॉलेजच्या एका कर्मचा-यानं या सर्व उत्तरपत्रिका नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी आणल्या आणि त्याठिकाणी काही प्राध्यापक या विद्यार्थ्यांना उत्तर सांगत होते आणि पेपर लिहिला जात होता. धक्कादायक म्हणजे प्राध्यापकांसोबत यावेळी, नगरसेवक सीताराम सुरे, आणि संस्थाचालक गंगाधर मुंडेही हजर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीनं सुरे यांच्या घरावर छापा टाकत 24 मुलं, 3 मुली, प्राध्यापक नगरसेवक आणि संस्थाचालकांना अटक केली.



या प्रकरणाची विद्यापीठानंही तातडीनं दखल घेत, हे परीक्षा केंद्र तातडींनं रद्द केलंय. तर याआधी झालेल्या पेपरमध्ये असला प्रकार झाला असल्यास चौकशी करून या सेंटरवर झालेले सर्व पेपर रद्द करण्यात येतील अशी माहिती दिलीये...