रत्नागिरी : चिपळूण जवळील सावर्डे येथे रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या तारेमुळे एका तरूणाचा बळी गेलाय. याला जबाबदार असणा-या महावितरणच्या अधिका-यांवर कारवाई करा, अशी मागणी सध्या सावर्डे ग्रामस्थांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळच्या विचित्र अपघात मयूर देवरुखकर या तरुणाचा महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे हकनाक बळी गेलाय. रत्नागिरीहून चिपळूणला मयूर जात असताना ट्रकच्या हुकमध्ये अडकलेली तार न दिसल्यानं त्याची मान तारेत अडकली आणि त्याचं शीरच धडावेगळे झाले. 


या अपघातानंतर सावर्डेच्या ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचा-यांना जाब विचारला... त्याही आधी म्हणजे दोन दिवसांपूर्वी सावर्डेच्या ग्रामस्थांनी या तारेसंदर्भात तक्रारही दिली होती. मात्र महावितरणकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या अपघाताप्रकरणी सावर्डे पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


अपघातानंतर संगमेश्वर आणि सावर्डेच्या ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिका-यांची भेट घेतली. मृत मयूरच्या नातेवाईकांना महावितरणनं चार लाखांची आर्थिक मदत देखील जाहीर केलीय. मात्र देवरुखकर दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाचे प्राण या आर्थिक मदतीनं परत येणार आहेत का? महावितरणकडे झालेल्या तक्रारीनंतर तत्काळ दुरुस्ती झाली असती तर कदाचित तरुण मयूरचा जीव वाचला असता, त्यामुळे महावितरणच्या बेजबाबदार अधिका-यांवर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.