शिवसेनेसोबत समेट घडवण्याचा भाजपचा शेवटचा प्रयत्न, अन्यथा मध्यावधी निवडणुका
शिवसेनेसोबत समेट घडवण्याचा शेवटचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.
दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया मुंबई : शिवसेनेच्या विरोधाच्या भूमिकेमुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. ही राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी विरोधी पक्षांचे आमदार फोडायचे किंवा मध्यावती निवडणुकींना सामोरं जायचं या पर्यायावर भाजपामध्ये विचार सुरू आहे. मात्र विरोधी पक्षाचे आमदार फोडणे अवघड असल्याने थेट मध्यावती निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भाजपात गांभीर्याने विचार सुरू आहे. त्याआधी शिवसेनेबरोबर शेवटची समेट करण्याचा प्रयत्न भाजपाचे मंत्री करणार आहेत.
सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीनंतर अचानक सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारची पावलोपावली कोंडी होत आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात तर शिवसेनेने थेट सरकारविरोधातच आवाज उठवत भाजपाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेने घेतलेल्या या विरोधाच्या भूमिकेमुळे अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारची अडचण झाली. कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेने विरोधकांना साथ दिल्याने विरोधाचा आवाज वाढला आणि सरकारविरोधात आणि भाजपाविरोधात वातावरण तयार होऊ लागले. कर्जमाफीवर गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांचे सरकारने निलंबन केल्यानंतर शिवसेनेने त्याविरोधातही भूमिका घेतली.
तर लेखानुदान चर्चेशिवाय मंजूर झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी सरकारविरोधात आवाज उठवला. या सगळ्या परिस्थितीत सरकारमध्ये निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्यासाठी भाजपाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या नेत्यांच्या बैठकीत याबाबतचे दोन पर्याय पुढे आले आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडणे आणि दुसरा पर्याय मध्यावती निवडणुकींना सामोरं जाणं.
आमदार फोडणे अवघड
यातील पहिला पर्याय भाजपासाठी अवघड आणि जिकरीचा दिसतोय. कारण विरोधी पक्षाचे २५ आमदार फोडू असा भाजपा दावा करत असला तरी ते शक्य नाही. कारण आमदार फोडल्यानंतर होणारी पोटनिवडणूक सोपी असणार नाही. त्यातच भाजपाने आमदार फोडले तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून भाजपाने फोडलेल्या आमदाराविरोधात पोटनिवडणुकीत एकच उमेदवार देण्याची रणनिती आखली जात आहे. असं झालं तर फुटलेले आमदार पुन्हा निवडून येणं अशक्य आहे.
दुसरीकडे पोटनिवडणुक टाळण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तृतीयंश आमदार फोडायचे. पण हा आकडा २८ च्या घरात जातोय. एका पक्षाचे एवढे आमदार फुटणे अशक्य आहे.
मध्यावधीचा पर्याय
त्यामुळे भाजपामध्ये आता दुसऱ्या पर्यायाचा म्हणजेच मध्यावधी निवणुकीच्या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक होत आहे, त्याबरोबर राज्यातील निवडणूक घेण्याबाबत भाजपा नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला यश मिळालं. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. याशिवाय भाजपाने राज्यातील सर्व्हे केला असून राज्यात अनुकूल स्थिती असल्याचा दावाही केला जातोय.
शिवसेनेशी समेटचा शेवटचा प्रयत्न
मध्यावती निवडणुकीच्या पर्यायाचा एकीकडे विचार सुरू असतानाच शिवसेनेबरोबर समेट करण्याचा शेवटचा प्रयत्नही भाजपाने सुरू केला आहे. त्यासाठीच भाजपाचे दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगुंटीवार मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेने विरोधाची भूमिका घेऊ नये अशी मागणी भाजपाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात मध्यावती निवडणूक झाली तर भाजपाला अनुकूल स्थिती असेल असा दावा भाजपाचे नेते करतायत. त्यामुळेच सत्तेत सहभागी असूनही भाजपालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्याची भावना भाजपात वाढीस लागली आहे. त्यादृष्टीने शिवसेनेबरोबर समेट अयशस्वी झाली तर राज्यात राजकीय भूकंप घडवून राजकीय अस्थिरता दूर करण्याच्या तयारीत भाजपा आहे.