आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्हा
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये धिंगाणा घालत असल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्ह्याची नोंद झालीय.
नागपूर : भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये धिंगाणा घालत असल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्ह्याची नोंद झालीय. एवढंच नाही तर मुलाविरोधात तक्रार झाल्याने चिडलेल्या या भाजप नेत्याने वस्तीतल्या रहिवाशांना दमदाटीही केल्याचा आरोप होत आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून भाजप नेते मुन्ना यादव आहेत.
नागपूरच्या शिवनगर भागातील या रहिवाशांना सोमवारची रात्र आठवली की अजूनही थरकाप उडतो. कारण राज्याच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष आणि भाजप नगरसेवक मुन्ना यादव आपल्या भावासह इथे आले होते. त्यांनी रहिवाशांना धमकी दिली होती. तेही एका क्षुल्लक कारणावरून. नागपूरच्या शिवनगर वस्तीत राहणारा सागर समुद्रे नावाचा तरूण मुन्ना यादव राहतात त्या चुनाभट्टी भागात आपल्या नातेवाईकांना भेटायला गेला होता. तिथे त्याचा मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुनशी वाद झाला. अर्जुनने धमकी दिल्याने सागरने तक्रार दाखल केली
आपल्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चिडलेल्या मुन्ना यादव आणि त्यांच्या भावाने सोमवारी रात्री वस्तीत येऊन दमबाजी केली. यादव यांच्याविरोधात रहिवाशांनी तक्रार दाखल केली. महत्त्वाचं म्हणजे याआधीही याच वस्तीत अर्जुन यादव आपल्या 25 ते 30 साथीदारांसह आल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. हातात काठ्या तलवारी घेतलेलं हे टोळकं सीसीटीव्ही कॅमे-यातही स्पष्ट दिसत आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या कुटुंबावर याआधीही अनेक प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण, अपहरण, धमकावणे असे अनेक गुन्हे दाखल झालेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यादव हे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीच वाढत आहे.